मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी पक्ष अन् चिन्हावर आपला दावा केला. त्यावर शरद पवार यांनी आपले मत मांडले. तसेच प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत त्यांनी भूमिका मांडली. अजित पवार यांच्या जाण्यापेक्षा प्रफुल्ल पटेल गेल्याचे दु:ख शरद पवार यांना जाणवत होते. पक्षातून जे गेले आहेत, त्यांच्यांवर कारवाई करण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली होती. परंतु त्यांनी पक्षाध्यक्षाच्या मार्गदर्शक सूचना मोडल्या. त्यांनी चुकीचं पाऊल उचललं आहे. आता त्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही. यामुळे त्यांनी पदावरून बाजूला व्हावे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रकरणानंतर देशाच्या कान्याकोपऱ्यातून आपणास फोन येत आहे. अनेक जणांनी या परिस्थितीत आपण सगळे एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मते मांडले, असे शरद पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांचा फोन आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीसुद्धा माझ्याकडून सर्व घडामोडींची माहिती घेतली. आम्ही सगळे सोबत आहे असे त्यांना सांगत आपण भाजपला एक पर्यायी शक्ती देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपला पक्ष पुन्हा उभा करणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. १९८० मध्ये निवडून आलेले सर्व लोक बाहेर पडले होते. आम्ही फक्त पाच जण होतो, त्यानंतर पक्ष उभा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.