मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Cooperative Bank) साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. यावेळी तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. तसंच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असंही तनपुरे म्हणाले आहेत. दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
मला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीला बोलावलेलं होतं. मात्र ईडीचे अधिकारी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे तीन वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली. मी ईडीला सविस्तर उत्तर दिलेली आहेत. मला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिलेली आहेत. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काही तांत्रिक माहिती जी मी पाठ करु शकत नाही ती मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देईन, असं तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
NCP leader Prajakt Tanpure being questioned by ED in connection with a money laundering case involving Maharashtra State Co-op Bank
— ANI (@ANI) December 7, 2021
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे पंचवीस हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा ईडीने तपासासाठी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिलं आहे. त्या सहकारी साखर कारखान्यांनी ते कर्ज फेडल नाही. त्यामुळे बँकेने ते कारखाने जप्त केलेत. हे जप्त केलेले कारखाने बँकेवर संचालक असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनीच कवडीमोल भावात विकत घेतले. हा सर्व प्रकार सहकारी साखर कारखाना घोटाळा म्हणून ओळखला जात आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघाचे आमदार आहेत.अहमदनगर जिल्ह्यात राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना होता. हा कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर करण्यात आला. हा लिलाव जाहीर झाला तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. कारखान्याचा लिलाव जाहीर केला तेव्हा कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड या कंपनीने तो केवळ 13 कोटी रुपयांना विकत घेतला. हाच व्यवहार ईडीला संशयास्पद वाटत आहे. त्या अनुषंगाने तनपुरे यांची चौकशी आज करण्यात आली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी नऊ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या धाडी मुंबई , पुणे , नागपूर आणि अहमदनगर येथे टाकल्या होत्या. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्ती, त्याचप्रमाणे राम गणेश गडकरी साखर कारखान्याशी संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी अनेक महत्वाचे कागदपत्रं ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले होते. याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आज तनपुरे यांची चौकशी झाल्याची माहिती मिळत आहे.
इतर बातम्या :