मुंबई: एकीकडे भाजप (bjp) आणि शिंदे गटाची मनसेसोबत जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांची महायुती होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तशा बातम्या अधूनमधून येत असतात. मात्र, आजची बातमी ही जरा वेगळी आहे. राज्याच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणारी ही बातमी आहे. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची शिवसेना यांची आघाडी होण्याची शक्यता आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना फोन केल्याची चर्चा असून या दोन्ही नेत्यांची लवकरच भेट होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाची आघाडी होऊन राज्याच्या राजकारणात नवं पर्व निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची चर्चा आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीवर बोलणं झाल्याचं सांगण्यात येतं.
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर हे 20 किंवा 21 तारखेला उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या भेटीकडे आणि त्यातील चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आघाडी करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आंबेडकर यांनी माध्यमांच्या माध्यामातून ही इच्छा जाहीर केलेली आहे. त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून फारसा प्रतिसाद आला नाही.
मात्र, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने ठाकरे गट कमकुवत झाला आहे. त्यामुळे शिंदे-भाजपला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे ही आघाडी करू शकतात असं सांगितलं जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनाच नव्हे तर काँग्रेससोबतही आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण काँग्रेसकडून त्यांना अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. आंबेडकर यांनी मात्र, राष्ट्रवादीला आघाडीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने चांगली कामगिरी केली होती. वंचितमुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभेचे 7 उमेदवार पडले होते. या मतदारसंघात वंचितने 50 हजाराहून मते घेतली होती.
तसेच वंचितने 10 ते 12 मतदारसंघात चांगलाच प्रभाव आहे. नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर आणि बुलढाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला होता.
तर विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 38 आमदार पडले होते. वंचितने प्रत्येक मतदारसंघात 10 हजाराहून अधिक मते घेतली होती.