Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? यावर येत्या एक-दोन दिवसात अंतिम शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. लोकसभेला वंचित बहुजन आघाडीची ताकद सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. वंचितमध्ये स्वत:चा उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नसली, तर समोरचा उमेदवार पाडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. पण प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जातील असं दिसत नाहीय.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांना हजेरी लावली. पण नेहमीच त्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे ते मनापासून महाविकास आघाडीसोबत जाणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. आता प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गट आणि पवार गटाला एक प्रश्न विचारलाय. त्यामुळे त्यांनी आता एकला चलो रे चा मार्ग स्वीकारलाय असं दिसू लागलय.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
‘भाजपासोबत जाणार नाही हे लिहून का देत नाही?’ असा सवाल प्रकाश आंबडेकर यांनी ठाकरे आणि पवार गटाला केलाय. “भाजपासोबत आधी गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. काँग्रेस, पवार आणि ठाकरे गटात 15 जागांचा तिढा आहे. मी इथे कोणाला उत्तर द्यायला बांधील नाहीय. ज्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केली आहेत, त्यांनी आम्हाला धुतल्या तांदळासारखे आहोत असं सांगू नये. यापुढे भाजपासोबत जाणार नाही, हे आम्हाला नाही, जो मतदार नव्यावे जोडला जाणार आहे त्यांना सांगा” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्रासाठी एनडीएच काय टार्गेट?
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. उत्तर प्रदेशात 80 तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रासाठी एनडीएने 45 जागांचे टार्गेट ठेवलं आहे.