लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अपेक्षेपेक्षाही अधिक मोठं यश मिळाल्याने त्यांना सोडून गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच शिंदे गटाचे सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे दावे ठाकरे गटाकडून केले जात आहे. हे दावे सुरू असतानाच शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी थेट ठाकरे गटालाच आव्हान दिलं आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सहा आमदारांपैकी एकाचे तरी नाव सांगा आणि 25 हजार रुपये बक्षीस घेऊन जा, असं आव्हानच प्रकाश सुर्वे यांनी दिलं आहे.
लोकसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील सहा आमदार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मात्र शिवसेना शिंदे गटातील एकही आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार नाही. ठाकरे गटातील सहा आमदारांच्या प्रवेशाबाबतचा तो दावा मागाठाने विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी खोडून काढला आहे. हा दावा खोडून काढताना अफवा पसरवणाऱ्यांनी एकाही आमदाराचे नाव सांगितल्यास त्याला रोख पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचेही सुर्वे यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सहा आमदार संपर्कात असल्याचा दावा खोडून काढला आहे. आम्हाला सोडून गेलं कोण ते सांगा. दावे तर मी गेल्या अडीच वर्षापासून ऐकत आहे. दावे प्रतिदावे या गोष्टींवर माझा विश्वास नाही. गर्दीमध्ये साप कसा सोडायचा हा त्या लोकांचा धंदा आहे. त्यांनी त्या पद्धतीने साप सोडलेला आहे. मात्र हा साप कसा पकडायचा हे आम्हाला माहीत आहे, असं मार्मिक उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शिंदे गटाच्या सर्व आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आमच्याही काही लोक संपर्कात आहेत. ही लोकं कुठली आहेत हे सांगता येत नाही. पण मराठवाड्यातील आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते. मराठवाड्यात तसं वातावरण आहे. अब्दुल सत्तार यांच्या मनातही अस्वस्थता असू शकते हे मी उदाहरण देऊन सांगू शकतो. आमच्या संपर्कात कुणीही आले तरी कुणाला सोबत घ्यायचं आणि कुणाला नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल, असं सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं.