सोलापूर : “भाजपकडून फोन टॅपिंग करुन खालच्या थराचं राजकारण केलं गेलं. समोरासमोर उभं राहून त्यांना सामना करता येत नाही म्हणून ते पाठीत खंजीर खुपसतात”, असा घणाघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Conress MLA Praniti Shinde) यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. यासंदर्भात प्रणिती शिंदे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (Conress MLA Praniti Shinde).
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, त्यानंतर लगेच केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतर केलं. यावर प्रश्न विचारला असता “एनआयटीकडून योग्य तपास होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
सोलापूर महापालिकेत गेल्या पाच वर्षात भाजपकडून प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका बरखास्त करण्याची मागणी आज प्रणिती शिंदे यांनी केली.
“सोलापूर महापालिकेत गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता होती. या काळात अमाप भ्रष्टाचार झाला. म्हणून सोलापूर महापालिका बरखास्त करण्याची मागणी आम्ही केली आहे. आतापर्यंत अनेक असे भ्रष्टाचार दिसून आले आहेत आणि याच पद्धतीचं राजकारण भाजप करते”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.