‘चाणक्य’ प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जींसाठी काम करणार

| Updated on: Jun 06, 2019 | 10:22 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय चाणक्य आणि निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी आज (6 जून)ला भेट घेतली.

चाणक्य प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जींसाठी काम करणार
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय चाणक्य आणि निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांची आज (6 जून)ला भेट घेतली. यावेळी ममता आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन तास चर्चा झाली. त्यामुळे प्रशांत किशोर ममतांसोबत काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला. त्यात प्रशांत किशोर यांची रणनीती असल्याचं म्हटलं जात होतं.

लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचे 18 खासदार निवडून आल्यानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता यांनी प्रशांत यांच्याशी भेट घेतल्याचं बोललं जात आहे. तसेच जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांपासून प्रशांत किशोर ममता बॅनर्जींसाठी काम करण्यास सुरुवात करणार असल्याची शक्यता आहे. 2021 मध्ये बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत टीएमसी भाजपला सडेतोड उत्तर देईल असे ममता यांनी सांगितले होते. तसेच टीएमसीने निवडणुकीची तयारीही सुरु केली असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवरच ममता आणि प्रशांत किशोर यांच्यात भेट झाल्याचं म्हटलं जातं आहे.

प्रशांत किशोर हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत आपल्या रणनीतीच्या जोरावर माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची सत्ता त्यांनी उलटून लावली होती. या रणनीतिमुळे जगनमोहन रेड्डी यांची सत्ता आली. आंध्रप्रदेशच्या सर्व 25 लोकसभा जागा आणि विधानसभेच्या 175 पैकी 150 जागांवर जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर पक्षाने विजय मिळवला.

प्रशांत किशोर गेल्यावर्षी राजकारणात आले. त्यांना जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून पद दिले गेले. पण निवडणुकीत पक्षाने त्यांना कोणतेही काम दिले नाही. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी काम केले होते. यानंतर 2015 मध्ये नीतीश कुमार यांच्यासोबत काम केले आणि त्यांना विजय मिळवून दिला. पण 2017 च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसला उत्तर प्रदेशात विजयी करण्यात अपयशी ठरले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या राजकीय वर्तुळातील चर्चा कमी झाल्या होत्या. दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसने किशोर यांच्या मदतीने विजय मिळवला होता.