रायगड : कर्जत नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या सुवर्णा जोशी यांनी बाजी मारली असून, राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांची कन्या अॅड. प्रतिक्षा लाड यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कर्जत नगरपरिषद निवडणुकीत 18 नगरसेवकपदांसाठी 43 उमेदवार, तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. एकूण 18 नगरसेवकांपैकी 10 शिवसेना-भाजप युतीचे, तर 8 राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक निवडून आले.
नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून सुवर्णा जोशी, तर राष्ट्रवादीकडून आमदार सुरेश लाड यांची मुलगी अॅड. प्रतिक्षा लाड या उमेदवार होत्या. त्यात सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत, प्रतिक्षा लाड यांचा पराभव केला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या सुवर्णा जोशी यांना 9972 मते, तर तर राष्ट्रवादी-मनसे आघाडीच्या उमेदवार अॅड. प्रतिक्षा लाड यांना 7363 मते मिळाली. शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांचा 2609 मतांच्या फरकाने विजय झाला.
सुरेश लाड यांच्या बालेकिल्ल्याला हादरा
कर्जत ग्रामपचांयतीची नगरपरिषद झाल्यापासून आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. मात्र, तरीही महायुतीच्या सुवर्णा जोशी यांनी आमदार लाड यांच्या बालेकिल्ल्याला हादरा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसला विश्वासात न घेतल्याने, हा पराभव झाल्याची सध्या कर्जतमध्ये चर्चा आहे.
आमदार सुरेश लाड कोण आहेत?
आमदार सुरेश लाड हे रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे कर्जत भागातील अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून सुरेश लाड ओळखले जातात. राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणूनही त्यांची ओळख आहे.