मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना मावळ गोळीबाराची आठवण करुन दिली. त्यावरुन आता पुन्हा एकदा जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी आज फडणवीसांना उत्तर देताना मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला तब्बल 90 हजाराचं मताधिक्य मिळाल्याचं सांगितलं. तर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे नातू पार्थ पवार पिछाडीवर होते याची आठवण करुन दिलीय. (Praveen Darekar’s reply to Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis and Maval Firing Case )
मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता. शेतकऱ्यांच्या मृत्यूला राजकीय पक्षाचे नेते जबाबदार नव्हते असं पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर मावळमध्ये आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे सांगत, मावळ तालुक्यात सातत्यानं जनसंघ, नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असंही पवार म्हणाले. इतकंच नाही तर मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकानं निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
दरम्यान पवारांच्या या टीकेला आता प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. पार्थ पवार लोकसभा निवडणुकीत उभे असताना मावळमधून पिछाडीवर होते, अशी आठवण दरेकरांनी पवारांना करुन दिली आहे. तसंच मावळात भाजपला जनाधार किती हे परत एकदा बघा, असं आव्हानही दरेकरांनी दिलंय. केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणं योग्य नाही. जे काय सुरु हे आहे ते न्यायालयाच्या चौकटीत सुरु आहे. केंद्रीय यंत्रणा चांगला तपास करत असतील तर त्यांची पाठ थोपटायला हवी. पण याउलट यंत्रणांना बळ मिळण्याऐवजी ड्रग्स तक्सरांना बळ दिलं जात आहे.
शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत्या वक्तव्यावरही टीका केली होती. पवारांच्या या टीकेला उत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी पवार आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावलाय. ‘महाराष्ट्रातील शेतकरी फडणवीस सरकारच्या काळात झालेली मदत आजही विसरलेला नाही. विरोधी पक्षनेते असूनही जनतेचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे’, असं दरेकर म्हणाले.
इतर बातम्या :
Praveen Darekar’s reply to Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis and Maval Firing Case