मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. तुम्ही भाजप पक्षात राहून विरोधकांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून काम करता, असं देवेंद्र फडणवीस मला (Devendra Fadnavis) नेहमी म्हणतात, असं प्रवीण दरेकर म्हणालेत. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. प्रवीण दरेकर यांच्या वतीने दिवाळी पहाट मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘प्रभाती सूर नभी रंगती’ हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना दरेकरांनी हे विधान केलंय.
‘प्रभाती सूर नभी रंगती’ या कार्यक्रमात बोलताना अभिनेते मनोज जोशी यांनी दरेकर यांचा उल्लेख विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असा केला. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी जुने किस्से सांगितले.
मी विरोधी पक्षनेता असताना केलेलं कार्य, दौरे आजही लोकांना आठवतात. त्यामुळेच मनोज जोशी यांनी विरोधी पक्षनेते असा माझा उल्लेख केला, असं ते म्हणाले. शिवाय फडणवीसांसोबतचाही किस्सा त्यांनी सांगितला. पक्षात राहून तुम्ही विरोधकांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून काम करता, असं देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात, असं दरेकरांनी सांगितलं.
प्रवीण दरेकर यांच्या वतीने ‘प्रभाती सूर नभी रंगती’ दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, मनोज जोशी, स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, अभिनेत्री हेमांगी कवी, श्रेया बुगडे, स्वाती देवल यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होते.
‘प्रभाती सूर नभी रंगती’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भुजबळांचाही उल्लेख केला. आजही मुंबईत महापौरांचं नाव घेताना पहिलं नाव छगन भुजबळ यांचं नाव येतं कारण छगन भुजबळ यांनी महापौर असताना केलेले काम आजही लोकांना आठवतं. त्यामुळे लोक अनेकदा छगन भुजबळ यांचा उल्लेख मुंबईचे महापौर असा करतात, असं दरेकर म्हणालेत.