रायगड : शासनाच्या सर्व विभागाच्या जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचे आदेश रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिला आहे. मात्र, या निर्णयावर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सडकून टीका केली (Pravin Darekar Slams Aditi Tatkare).
“प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसील कार्यालयात पालकमंत्री कक्ष असला म्हणजे आपल्याला राजकीय दुकानदारी करता येईल. जनतेच्या हितासाठी कामे करावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला नाही. तर राजकीय उद्देशानेच हे सर्व होत आहे”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.
प्रवीण दरेकर यांनी रविवारी (18 ऑक्टोबर) रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, माणगाव, पेण येथील नुकसानग्रस्त भातशेतीचा धावता दौरा केला. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधला (Pravin Darekar Slams Aditi Tatkare).
“पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचा निर्णय धोरणात्मक असता तर शासनस्तरावर संपूर्ण राज्यासाठी तो निर्णय घेण्यात आला असता. फक्त एखाद्या जिल्ह्यासाठी असा निर्णय घेता येत नाही. अन्यथा उद्या प्रत्येक आमदारांच्या मनात आलं तर ग्रामपचांयत आणि पचांयत समिती कार्यालयातही आमदार कक्ष स्थापन केला तर चालेल का?”, असा सवाल दरेकर यांनी केला.
“मी माणगावला गेलो होतो. रोह्याच्या जवळपासही पालकमंत्री अजूनही शेतात पोहचले नाहीत. मग पालकमंत्री कक्ष काढून काय करणार?”, असादेखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“लोकांसाठी दक्ष असावं लागतं. लोकांमध्ये जायला हवं, त्यांची दु:ख समजून उपाययोजना केल्या तर अशा कक्षांची आवश्यकता नाही. प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालय असतं. प्रांतांची यत्रंणा असते. या यत्रंणा असताना राजकीय व्यवस्था उभ्या राहील्या तर राजकीय संघर्ष उभा राहील. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचा निर्णय योग्य वाटत नाही”, अशी भूमिका दरेकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागासाठी महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
जालन्यात कोरोना चाचण्यांच्या निकृष्ट किट्स; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: दरेकर