नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भारताचे पंतप्रधान (Indian Prime Minister) आहेत. पण अवघ्या जगात त्यांच्या नावाचा एक ब्रँड (Brand) तयार झालाय. एखाद्या पंतप्रधानांचं नाव ब्रँड म्हणून ठसण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्थात या ब्रँडवरून विरोधक अनेकदा टीका करत असतात, ही बाब वेगळी. एक सामान्य कार्यकर्ता ते पंतप्रधान आणि ब्रँड मोदी इथपर्यंतचा प्रवास नरेंद्र मोदींसाठी सोपा नव्हता. आज जगात नाव दिसत असलं तरी अनेक वर्षांपूर्वी एका कार्यकर्त्याची मेहनत आणि संघर्ष यामागे आहे. त्यामुळेच आज राम मंदिराचं बांधकाम, कलम 370 रद्द करणे यासारखे महत्त्वाचे ठोस निर्णय ते घेऊ शकले. पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातील आशा पूर्णत्वास नेऊ शकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक, राजकीय जीवनाविषयी थोडं सविस्तर जाणून घेऊयात… यासोबतच मोदींच्या मते आदर्श कार्यकर्ता कोण, हेही पाहुयात…
गुजरातमधील वडनगर इथं 1950 मध्ये नरेंद्र मोदींचा जन्म झाला. वयाच्या 8 व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सान्निध्यात आले. 70 च्या दशकात ते खऱ्या अर्थाने संघ प्रचारक झाले. 22 व्या वर्षी त्यांनी पूर्णवेळ संघासाठी काम करायला सुरुवात केली. समाज आणि संघटनेसाठी काम करताना त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत गेलं. याच काळात त्यांनी राज्यशास्त्रातील पदवी मिळवली.
मोदी संघ प्रचारक होते. तेव्हा संपूर्ण गुजरातेत दौरे करावे लागत. त्यावेळी गुजरातेत काँग्रेसचं सरकार होतं. सामान्य जनतेत रुजण्यासाठी संघाचे प्रयत्न सुरु होते. देशभरातील या कार्याची जबाबदारी नरेंद्र मोदींसारख्या संघ प्रचारकांवर होती. दरम्यानच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींविरोधातील असंतोष वाढत गेला. गुजरातमध्ये शुल्कवाढीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं. विद्यार्थी संघटनेनं जेपींच्या नेतृत्वात आंदोलन सुरु केलं. यामागे संघ होता. राजकीय संकट पाहून इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. या काळात नरेंद्र मोदींसारख्या नेत्यांनी भूमिगत होऊन एक कार्यकर्ता म्हणून आवाज बुलंद ठेवला. नरेंद्र मोदी यांनी या काळातील अनुभव ‘संघर्षमा गुजरात’ या पुस्तकात लिहून ठेवलेत.
6 एप्रिल 1980 रोजी भाजपाची स्थापना झाली. कलम 370 रद्द करणे, राम मंदिर आणि समान नागरी कायद्यात सुधारणा हे तीन मुद्दे अजेंड्यावर होते. 1984च्या निवडणुकीत भाजप उतरली. 2 जागा मिळाल्या. पण अजेंडा कायम ठेवत भाजपा वाटचाल करत राहिली. 1986 मध्ये नरेंद्र मोदी भाजपात आले. काही महिन्यातच गुजरातमधील अहमदाबाद पालिकेवर भाजपाची सत्ता आली. इथूनच मोदींच्या राजकीय कारकीर्दीनं वेग पकडला.
आणीबाणीनंतर नरेंद्र मोदींचं भाजपातील स्थान सशक्त होत गेलं. त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. राम मंदिर बांधण्याची मागणी जोर धरू लागली. 1991 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात काढलेल्या राम मंदिर यात्रेत नरेंद्र मोदी त्यांचे सारखी बनले. आडवाणींनी सोमनाथ ते अयोध्यापर्यंत रथयात्रा केली. गुजरातेत या यात्रेला भव्य प्रतिसाद मिळाला.
स्वातंत्र्याच्या तीन दशकानंतरही काश्मीरच्या लाल चौकावर तिरंगा फडकलाच नव्हता. नरेंद्र मोदींनीच हे काम केलं. 90 च्या दशकात काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवावदी कारवाया सुरु होत्या. त्यावेळी मनोहर जोशींच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत यात्रा काढली गेली. काश्मीरमध्ये लाल चौकावर तिरंगा फडकवून यात्रेची समाप्ती करणार होते. अनेक धमक्या आणि अडथळ्यानंतर मनोहर जोशींही हा तिरंगा फडकावला. यात्रेच्या समन्वयाचं काम नरेंद्र मोदींनी पार पाडलं होतं.
गुजरातेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातही भाजपाची सत्ता मिळवण्यात मोठी कामगिरी बजावली.
दीर्घकाळ पक्षाचा कार्यकर्ता राहिल्याने नरेंद्र मोदी यांचा एक दृष्टीकोन विकसित झालाय. त्यांनी आदर्श कार्यकर्त्याचे 4 वैशिष्ट्य सांगितलेत. पक्षाचे महासचिव असताना त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात हे गुण सांगितले. पायाला भिंगरी, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि मनात संयम हीच ती 4 वैशिष्ट्य आहेत.