मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण महाविकास आघाडीसोबत राहणार अशी भूमिका स्पष्ट केली. मात्र, आज सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावावर विचार करण्यास आम्ही तयार आहोत, पण 24 तासाच्या आत आमदारांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी केलंय. तर आधी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, मगच चर्चा करु, असं शिंदे गटाच्या आमदारांनी स्पष्ट सांगितल्याचं सूत्रांकडून कळत आहे. अशावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिवसेनेच्या आजच्या भूमिकेवर शंका आणि आश्चर्यही व्यक्त केलंय. तसंच ही सेना नेमकी कुणाची हेच कळत नसल्याचं ही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मला हे समजत नाही, ते महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात, मग ते भाजपसोबत जाणार आहेत का? अर्थात अधिकृपतपणे उद्धव ठाकरे याबाबत काही बोलले नाहीत. पण आता गुवाहाटीत 45 आमदार जमलेला फोटो पाहिल्यानंतर दबावाखाली शिवसेनेच्या नेतृत्वाने ही भूमिका घेतली आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच उलगला होत नाही की महाविकास आघाडीतून बाहेर पडून शिवसेना किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री भाजपसोबत जायला तयार आहेत का? भाजपसोबत जाऊन दुय्यम भूमिका घेणार का? हे स्पष्टीकरण नेतृत्वाकडून आलं तर बरं होईल. कोण प्रतिक्रिया देतंय, कोण प्रवक्ता आहे, कोण अधिकृत आहेत हेच आपल्याला कळायला मार्ग नाही. काल उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्यामध्ये असं काही बोलले नाहीत. पण मला वाटत नाही की उद्धव ठाकरे काही आमदारांच्या दबावामुळे सत्ता टिकवण्यासाठी किंवा सत्तेत राहण्यासाठी असा काही यूटर्न घेतील असं मला वाटत नाही. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यावर बोलू शकत नाही.
आमच्या वैयक्तिक पक्षाची भूमिका काय तर आमच्या हातात काहीच नाही. महाविकास आघाडीत घटक पक्षांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, नेतृत्वाचा प्रश्न आहे. पण मला आश्चर्य वाटतं की 24 तासाच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यूटर्न घेतील याबाबत मला आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आमच्या पक्षाचे काही नेते गेले तेव्हाही ते काही बोलले नाहीत. किंवा फेसबुक लाईव्हमध्येही त्यांनी याबाबत काही वक्तव्य केलं नाही. मग आता ही सकाळची भूमिका आहे की दुसऱ्या कुणाची अधिकृत भूमिका आहे, हे उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन सांगितलं तर अधिक चांगलं होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.