नवी दिल्ली : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला आहे. पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली.
प्रियांका गांधी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसच्या व्यासपीठांवर, तसेच प्रचारसभांमध्ये उपस्थिती लावली होती. मात्र, सक्रीयपणे राजकारणात त्यांनी प्रवेश केला नव्हता. अखेर पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदासह प्रियांका गांधी यांनी सक्रीय राजकारणातही पाऊल टाकलं आहे. त्यामुळे प्रियांका यांच्या रुपाने गांधी कुटुंबातील आणखी एक जण राजकारणात दाखल झालंय.
कोण आहेत प्रियांका गांधी?
प्रियांका गांधी या भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची नात, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कन्या आहेत. प्रियांका यांच्या आई म्हणजे सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत, तर भाऊ राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
गांधी कुटुंब भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच राजकारण आणि समाजकारणात सक्रीय राहिलं आहे. प्रियांका गांधी यांच्या आजीचे वडील म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बहुमोल योगदान दिलं, तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारताची घडी बसवण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आता याच कुटुंबातील नवी पिढी म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या राजकारणात सक्रीय झाले आहेत.
नेहरु-गांधी कुटुंबाने भारताच्या जडण-घडणीत मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे याच कुटुंबातील प्रियांका गांधी यांच्या कामगिरीकडे आणि वाटचालीकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
INC COMMUNIQUE
Appointment of General Secretaries for All India Congress Committee. pic.twitter.com/zHENwt6Ckh
— INC Sandesh (@INCSandesh) January 23, 2019