जालना : माझं वय 92 वर्षे असलं म्हणून काय झालं? शरद पवारांनी आदेश दिल्यास जालन्यात रावसाहेब दानवेंविरोधात लढेन, अशी इच्छा माजी खासदार पुंडलीकराव दानवे यांनी व्यक्त केली. पुंडलीकराव दानवे हे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असून, माजी खासदार आहेत. रावसाहेब दानवे हे पुंडलिकराव दानवेंना गुरु मानतात.
पुंडलिकराव दानवे नेमकं काय म्हणाले?
माझं वय 92 वर्ष असलं म्हणून काय झालं? शरद पवारांनी आदेश दिल्यास जालना लोकसभेतून रावसाहेब दानवेंविरोधात लढेन. ही गुरु-शिष्याची नाही तर राम रावणाची लढाई होईल. रावसाहेब दानवेंना शिष्य म्हणायची लाज वाटते. जशी लाज बिभीषणाला रावणाची वाटत होती.” असे पुंडलिकराव दानेव म्हणाले.
तसेच, संसदेच्या इमारतीला पिल्लर किती, या प्रश्नाचं उत्तर रावसाहेब दानवेंनी दिल्यास त्यांच्या विरोधात काम करणं सोडून देईन, असं आव्हानच माजी खासदार पुंडलीकराव दानवे यांनी रावसाहेब दानवे यांना दिलं आहे.
कोण आहेत पुंडलिकराव दानवे?
पुंडलिकराव दानवे हे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. सध्या त्यांचे वय 92 इतके आहे. 1977 मध्ये जनाता दलाकडून त्यांना जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते आणि जिंकलेही होते. नंतर भाजपकडून चार वेळा लोकसभा लढले, मात्र त्यातील एक निवडणूकच ते जिंकले. अगदी 1990 पर्यंत जालना जिल्हा म्हणजे पुंडलिकराव दानवे असे समीकरण होते.
पुढे जालन्यात रावासाहेब दानवे यांच्या राजकीय कारकीर्दीचा उदय झाला. 1985 साली रावसाहेब दानवे हजार-दीड हजार मतांनी पराभूत झाले. मात्र, जालन्याच्या राजकारणात त्यांनी आपला जम बसवला. पुढे 1990 मध्ये रावसाहेब दानवे विधानसभेवर निवडून गेले आणि भाजपमध्ये पुंडलिकराव दानवे मागे पडत गेले.
पुढे पाचवेळा जालन्यातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवणाऱ्या पुंडलिकरावांना भाजपने तिकीट नाकारलं आणि नंतर मग रावसाहेब दानवे आणि पुंडलिकरावांमधील अंतर वाढत गेलं.
जालना जिल्ह्यातील सध्याचे राजकारण
जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विद्यामान खासदार आहेत. मात्र, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंविरोधात लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे जालन्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. खोतकरांना समजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वजण हातपाय हलवू लागले आहेत.