पुणे : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. दुसरा शरद पवार यांना मानणारा एक गट तर अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन करणारा दुसरा गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. अशात पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके हे नेमकं कुणाच्या बाजूने आहेत. याचं उत्तर बेनके यांनी पत्रकार परिषद घेत दिलं आहे.
माझी भूमिका तटस्थ आहे. विकास कामासाठी मी ज्यांच्याकडे जावे लागेल. त्यांच्याकडे मी जाणार आहे, असं अतुल बेनके म्हणाले आहेत.
मी ही परिस्थिती पाहता 2024 च्या निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत मी नाही. मी जाहीर करतो की, मी समाज कार्यात कार्यरत राहील, असं जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे. राहिलेलं एक वर्ष मी जुन्नर तालुक्यातील जनतेची कामं करणार आहे, असंही ते म्हणालेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही अतुल बेनके यांनी भाष्य केलंय. त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
जुन्नर तालुक्याच्या हितासाठी अजित पवार हे पाहिजेत. बुडीत बंधाऱ्याची कामं रखडली आहेत. सरकार बदललं आणि नवीन सरकारने काही बदल केले आहेत. शरद पवार यांच्या बद्दल जितका आदर आहे तितकाच आदर अजित पवार यांच्याबद्दलही आहे. माझ्या मनात पहिलं स्थान दिलीप वळसे पाटील आणि त्यानंतर अजित पवार यांना आहे. आम्ही पवार कुटुंबासोबत आहोत. त्यामुळे हा निर्णय घेणं अवघड आहे, असं अतुल बेनके म्हणाले आहेत.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत. लोकांनी आम्हाला विकास कामे करण्यासाठी निवडून दिलं आहे. मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटबद्ध आहे. मी ही परिस्थिती पाहता 2024 च्या निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नाही, असं मी जाहीर करतो. मी समाज कार्यात कार्यरत राहील, असंही बेनके म्हणाले.
जुन्नरच्या हितासाठी मार्ग निवडला गेला पाहिजे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. मात्र त्यानंतर अजित पवार हे देखील आमचे नेते आहेत. मी तब्येत ठीक नसल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहता आलं नाही. जेव्हा माणसाची घालमेल होते. तेव्हा शरीराचे ऐकायचं असतं. शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही माझ्या मनात आणि शरीरात आहेत, असं अतुल बेनके यांनी म्हटलं आहे.