Vasant More Resign From Mns | पुण्यातील मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वासह सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या वर्षभरापासून वसंत मोरे यांच्या नाराजीची चर्चा होती. मध्यंतरी शिवतीर्थवर बोलवून वसंत मोरे यांची समजूत सुद्धा काढण्यात आली होती. पण तरीही, त्यांच्या नाराजीच्या चर्चा कानावर ऐकू येत होत्या. अखेर या सर्वाची परिणीत त्यांच्या पक्ष सोडण्यात झाली आहे. मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी TV9 मराठीली पहिली प्रतिक्रिया दिली. “मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले. वसंत मोरे नाराज आहे. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असं माझ्याबद्दल बोललं गेलं” असं वसंत मोरे म्हणाले.
“एवढी वर्ष मनसेत कधी स्वकेंद्रीत राजकारण केलं नाही. तिथे राहून उगाच माझ्या चारित्र्यावर आरोप होत असतील, तर अशा ठिकाणी न राहिलेलं बरं” असं वसंत मोरे म्हणाले. “माझी आता कुठलीही भूमिका नाही. मी सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्ष सदस्यत्व सोडलं आहे. मी संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील. पुढच्या दोन-तीन दिवसात भूमिका जाहीर करेन” असं वसंत मोरे म्हणाले.
दोन-तीन दिवसात भूमिका जाहीर करणार
कोणत्या पक्षाकडून ऑफर आहे का? या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले की, “मी माझी भूमिका पुणेकरांसमोर मांडेन. कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची की, अपक्ष ते सांगेन” “मनसेकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण माझ्या उमेदवारीबाबत निगेटीव्ह गोष्टी पोहोचवल्या गेल्या. कुठल्याही गोष्टीची छाननी न करता निर्णय घेतले गेले. आता मला कशातच इंटरेस्ट नाही. पक्षातील जे अन्य इच्छुक आहेत, त्यांनी आता निवडणूक लढवावी” असं वसंत मोरे म्हणाले.
अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा … pic.twitter.com/25IQRaLfXQ
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) March 12, 2024
माझी फक्त अग्निपरीक्षा बाकी होती
“वारंवार माझ्या पक्ष निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. मी कितीवेळा दाखवायची पक्षनिष्ठा. माझी फक्त अग्निपरीक्षा बाकी होती. माझा वाद राजसाहेबांसोबत नव्हता. पुण्यात माझ्याविरोधात जे राजकारण झालं, त्याला कंटाळून मी राजीनामा देत असल्याच त्यांनी स्पष्ट केलं”