योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 11 जानेवारी 2024 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता होती. मात्र अजित पवार यांनी या कार्यक्रामाला जाणं टाळलं. यापूर्वी नाट्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं होतं. यावर राष्ट्रवादीचे, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
अजित पवार यांना महत्त्वाचे काम आले असावे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम असावे आणि अजित दादा हे कार्यक्षम असतील. म्हणून ते आजच्या सभेला आले नसावेत. आज अजितदादा बैठकीला येणार हे मला कळालं होतं. माझा कार्यक्रम बारामतीमध्ये होता. पण आजचा कार्यक्रम महत्त्वाचा होता. म्हणून मी आलो दुसरे का नाही आले मला माहिती नाही, असं रोहित पवार म्हणाले.
आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्व साधारण सभा होत आहे. या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित आहेत. मात्र अजित पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं. यावरून रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल लागला. या निकालावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. काल विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला. तो सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय विरोधात दिला. सुप्रीम कोर्टात गेलं की हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल. राज्यात जनतेचे प्रश्न नाही आमदारांचे प्रश्न सुटत आहेत. विधानसभा अध्यक्ष यांना भाजपच्या मोठ्या नेत्यांचे ऐकावं लागलं आणि तसा निर्णय द्यावा लागला. संविधान आता टिकेल का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे, असं रोहित पवार म्हणालेत.