संजय राऊत जेलमध्ये होते तेव्हा राज्यात शांतता होती, पण आता…; शिवसेना नेत्याचा घणाघात

| Updated on: May 24, 2023 | 12:26 PM

Shambhuraj Desai on Sanjay Raut : उन्हाळ्याचे दिवस आहेत, आराम करा; संजय राऊत यांना कुणी दिला सल्ला?

संजय राऊत जेलमध्ये होते तेव्हा राज्यात शांतता होती, पण आता...; शिवसेना नेत्याचा घणाघात
Follow us on

पुणे : शिवसेना नेते, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत जेव्हा जेलच्या आत होते, तेव्हा राज्यात शांतता होती. संजय राऊत तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आता उन्हाळा सुरू आहे. म्हणून त्यांना परत सरकारी विश्रांतीची गरज आहे. आमच्या समर्थकांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य संजय राऊतांनी करू नये, असं शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

आजच्या सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर भाष्य करण्यात आलं आहे. त्यावर शंभुराज देसाई यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामानाच्या अग्रलेखाला एक दर्जा होता. मात्र संजय राऊत जेव्हापासून लिहायला लागलेत तेव्हापासून त्याला दर्जा राहिला नाहीये. मी आजचा अग्रलेख वाचला नाहीये, असं शंभुराज देसाई म्हणालेत.

संजय राऊत आता जयंत पाटलाचे प्रवक्ते झालेत. ते विश्वप्रवक्ते झाले आहेत. जयंत पाटील कधीही दबावाबद्दल तसं बोलले नाहीत. मग संजय राऊतांना के स्वप्न पडलं होतं का?, असा सवाल शंभुराज देसाई यांनी विचारला आहे.

एक बरं आहे, उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर जावं लागलं होतं. तसं केजरीवालांच्या भेटीसाठी दिल्लीला जावं लागलं नाही, अरविंद केजरीवाल-उद्धव ठाकरे भेटीवर देसाईंनी टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. मोदींना कितीही आव्हान देण्याचा प्रयत्न केला तरी देशात काही फरक नाही, असंही ते म्हणालेत.

या महिना अखेरीला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जातंय. त्यावर देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. लवकरच मंत्री विस्तार होईल. कुणाला मंत्री करायचं. कुणाला महामंडळावर घ्यायचं याचा सर्वस्वी अधिकार शिंदे आणि फडणवीसांचा आहेत. सर्वांना समान न्याय देणारं धोरण शिंदे-फडणवीस स्वीकारतील, असा विश्वास आहे, असंही शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 19 जागांवर हक्क सांगण्याचा अधिकार नाही. त्यापैकी 13 खासदार गेलेत. त्यामुळे तुम्हाला 19 जागांवर हक्क सांगण्याचा अधिकार नाहीये. असा अधिकार सांगणं हास्यस्पद आहे. मी आज लिहून देतो जागावाटपावरून महाविकास आघाडीत एकमत होणार नाही, असं ते म्हणालेत.

अनिल देशमुखांना ईडी चौकशीबद्दल सांगायला दोन वर्षे लागली. त्याचवेळी त्यांनी बोलायला पाहिजे होतं. ज्यावेळी चौकशी सुरू असते त्यावेळी बोलले नाहीत. आता ते बोलतायेत. म्हाडाच्या नियमात जो पात्र होईल त्याला घर मिळेल, जो पात्र होणार नाही त्याला घर मिळणार नाही, असं म्हणत आमदारांच्या घरांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.