Vasant More Join Thackeray Group : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले वंचित आघाडीतील पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी पुण्याहून येताना वसंत मोरेंकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. वसंत मोरेंसह तब्बल २३ नेते आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटात कोणती जबाबदारी असणार याबद्दलही भाष्य केले. माझं हे शक्तीप्रदर्शन पहिल्यांदा नाही. माझ्या मागे जनतेची शक्ती आहे ती शक्ती सातत्याने माझ्या पाठीमागे असते. कार्यकर्त्यांची ताकद वसंत मोरेंच्या पाठीमागे आहे. गेल्या १७ वर्षांपासून पुणे शहरात जे काही राजकारण सुरु आहे. आज जवळपास मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी बऱ्यापैकी आज माझ्यासोबत सर्वचजण प्रवेश करत आहेत, असे वसंत मोरे म्हणाले.
मी यापैकी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाला सांगतोय की ज्यांना पक्षात राहायचं ते राहू शकतात. परंतू पक्षात जे राजकारण सुरु होतं, हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता मी या सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत आहेत, असेही वसंत मोरेंनी म्हटले.
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.