मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच छुपे मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला आहे. मंत्रालयातील (Mantralaya) वॉर रुमच्या मुद्द्यावरुन त्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकावर टीका केली. मंत्रलयामध्ये दोन वॉररुम स्थापन करण्यात आले आहेत. दोन वॉररुम स्थापन करुन शिंदे-फडणवीस एकमेकांमध्येच स्पर्धा करु पाहत आहेत का, अशी शंकादेखील मनिषा कायंदे यांनी व्यक्त केलीय.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात जेव्हा होतं, त्यावेळी विरोधक असलेल्या भाजपने या सरकारला तीन चाकांचं रिक्षा सरकार म्हणून हिणवलं. पण आता राज्यात दोन चाकाचं स्कूटर सरकार आल्याचं म्हणत मनिषा कायंदे यांनी खोचक टोला लगावला आहे. 13 सप्टेंबर रोजी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांच्याही वेगवेगळ्या वॉररूम स्थापन करण्यात आल्या यावरून असे दिसते स्कूटर सरकार मध्ये कोणताही समन्वय नाही. @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @LoksattaLive @news_lokshahi @zee24taasnews pic.twitter.com/0Dt3RcbroE
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) September 13, 2022
देवेंद्र फडणवीस हेच छुपे मुख्यमंत्री आहेत की काय? असा बोचरा सवाल या व्हिडीओच्या माध्यमातून मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वेगवेगळी वॉररुम का? या दोघांचीही एकमेकांमध्ये स्पर्धा सुरु आहे का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गट आणि भाजपकडून काय प्रत्तुत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती, तेव्हा राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये नसू, असंही म्हटलं होतं.
पण विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र चकीत झाला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील कारभारावरुन शिवसेनेकडून टीका केली जाते आहे.