अहमदनगर : नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (12 एप्रिल) नगरमध्ये सभा होणार आहे. मोदींच्या भाषणापेक्षा या सभेचं महत्त्व वाढलंय ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या संभाव्य भाजपप्रवेशामुळे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी 9.30 वाजता नगरमध्ये सभा होणार आहे. भाजपकडून या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
नगर दक्षिणमधून मुलाला म्हणजे सुजय विखेला आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत. सुजय विखेंनी तर भाजपमध्ये प्रवेश करुन, नगर दक्षिणमधून तिकीटही मिळवलं. मुलगा सुजय विखेच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानलं जात होतंच. मात्र त्याआधी राधाकृष्ण विखेंनीच ट्रेलर दाखवला. थेट भाजपच्या बैठकीत विखे हजर राहिले.
विशेष म्हणजे, याआधी आपण प्रचारही करणार नाही, आणि भाजपमध्येही जाणार नाही, असं राधाकृष्ण विखे वारंवार सांगत होते. मात्र, आता मुलाचा प्रचार त्यांनी सुरु केलाच आहे, मात्र थेट भाजपमध्येच प्रवेश करणार असल्याची खात्रिलायक माहिती आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांची नाराजी
मुलगा सुजय विखे याच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील नगर दक्षिणच्या जागेसाठी आग्रही होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपानुसार नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येते. मात्र, राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या सुजय विखे पाटील यांनी थेट काँग्रेसचाच ‘हात’ सोडला आणि भाजपचा ‘कमळ’ हाती घेतला. या घटनेमुळे विरोधी पक्षनेत्याच्या घरालाच खिंडार पाडण्यात काँग्रेसला यश आलं. मात्र, भाजपने सुजयला पक्षात घेऊन विखेंच्या घराला फक्त खिंडार पाडलं, पूर्ण घरच पक्षात घेतलं, हे आज स्पष्ट होईल.