मुंबई : सरकार बदलून मुख्यमंत्र्यांना ९ महिने होत नाहीत, तोच नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील नवे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा रंगल्या. सोशल मीडियातून या चर्चेची सुरुवात झाली आणि त्यानंतर काही संकेतस्थळावरही बातम्या प्रसिद्ध झाल्या. विशेष म्हणजे या बातम्या 15 मार्चपासून सोशल मीडियात फिरत होत्या. पण त्या हायलाईट झाल्या विखेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर. राधाकृष्ण विखे पाटील
शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात आघाडीवर राहिले. पत्रकार परिषदेवेळी विखे शिंदेंच्या बाजूला होते आणि योगी आदित्यनाथांच्या भेटीवेळी सुद्दा विखेंची हजेरी विशेष दिसत होती. त्याच तर्काच्या आधारावरुन मार्चमधली बातमी पुन्हा फिरली. मात्र हे सारं षडयंत्र आहे. शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्व सरकार चांगलं काम करतंय, असं म्हणत विखे पाटलांनी या सर्व चर्चांना फोल ठरवलंय.
सर्वोच्च न्यायालयात विद्यमान सरकारची अडचण होऊ शकते. अशा स्थितीत जर निकाल विरोधात लागला तर भाजपनं प्लॅन बी तयार ठेवलाय. जर सरकार बनवण्याची पुन्हा संधी मिळाली तर अशा वेळी मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना पुढे केलं जाऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार एक मराठा चेहरा, अनुभव आणि सलग सात वेळा आमदार राहिलेल्या विखे पाटलांचं नाव यासाठी चर्चेत आहे. सुरुवातीला नगर जिल्ह्यापुरता व्हायरल होणारी ही बातमी सोशल मीडियात पसरली. त्यानंतर स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांना यावर खुलासा करावा लागला. फक्त आपल्या बदनामीच्याच हेतूनं ही बातमी पसरवल्याचा आरोप विखे पाटलांनी केलाय.
बातमीचं विखे-पाटलांनी खंडन केलंय. पण भाजप प्रवेशानंतर अल्प काळात विखे पाटलांनी हायकमांडचा विश्वासही संपादन केलाय. सरकार बदलानंतर शिंदे-फडणवीसांनंतर मंत्रिपदाची पहिली शपथ विखेंना देण्यात आली. विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेटही घेतलीय. दिवंगत नेते पद्मश्री बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित होते. केंद्रानं सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर अमित शाहांच्या उपस्थितीत पहिली सहकार परिषद प्रवरानगरमध्ये झाली.
असंही म्हटलं जातंय की विखे मुख्यमंत्री व्हावेत, या बातमीमागे उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळावा, असं मानणारे काही समर्थक होते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुख्यमंत्रीपद गेलंय. पण उत्तर महाराष्ट्रातून अद्याप एकही मुख्यमंत्री झालेला नाही. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर नेहमी उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी कुणाचं ना कुणाचं नाव पुढे केलं जातं.