बुलडाणा : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत खलबतं सुरु आहेत. एकीकडे, या जागेवरुन राजेंद्र शिंगणेंना उभं करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतून सुरु आहे, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना बुलडाण्यातून उतरवण्यासाठी खासदार राजू शेट्टी प्रयत्नशील आहेत. मात्र, बुलडाणा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार असून, तिथे सेनेचे प्राबल्य सुद्धा आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची बुलडाण्यात भेट झाली. नुसती भेट नव्हे, तर दोघांमध्ये जवळपास एक तास बंद दाराआड चर्चाही झाली. त्यामुळे बुलडाण्यात काय राजकीय उलथापालथी घडतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे.
शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे 18 फेब्रुवारी रोजी बुलडाणा दौऱ्यावर होते. शहीद जवानांच्या नातेवाईकांच्या भेटीसाठी ते बुलडाण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची भेट झाली. यावेळी काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि स्वाभिमानीचे युवा कार्यकर्ते रंजित बागल सुद्धा उपस्थित होते.
बुलडाणा लोकसभा : शिवसेनेसमोर बालेकिल्ला राखण्याचं आव्हान
रोहित पवार आणि रविकांत तुपकर यांच्या बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे कळू शकले नाही. मात्र, बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. बुलडाणा लोकसभेच्या जागेवरूनच आघाडी आणि स्वाभिमानीमध्ये जोरदार वाद सुरू आहे. बुलडाण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना खासदार राजू शेट्टी यांनी मात्र रविकांत तुपकरांसाठी बुलडाण्याच्या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आघाडीमध्ये बुलडाणा लोकसभेची जागा रविकांत तुपकरांना सुटण्याची दाट शक्यताही वर्तवल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार आणि रविकांत तुपकर यांच्या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, रोहित पवार किंवा रविकांत तुपकर यांनी अधिकृतरित्या अद्याप या भेटीबाबत आणि त्यातील चर्चेबाबत कुठेही वाच्यता केली नाही.