तुम्ही मणिपूरमध्ये भारतमातेची… राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘ते’ शब्द हटवले

| Updated on: Aug 10, 2023 | 11:11 AM

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मणिपूरमध्ये भाजप फेल्युअर झाल्याचं म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली होती. ज्या शब्दांचा वापर करता कामा नये, असे शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत.

तुम्ही मणिपूरमध्ये भारतमातेची... राहुल गांधी यांच्या भाषणातील ते शब्द हटवले
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल अविश्वास ठरावावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी राहुल गांधी यांनी मणिपूरमधील हिंसेवरून मोदी सरकारवर प्रचंड हल्ला चढवला. तुम्हाला मणिपूर हिंसेचं काही पडलेलं नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली आहे. तुम्ही मारेकरी आहात. तुम्ही देशप्रेमी नाहीत. देशद्रोही आहात, असा घणाघाती हल्लाच राहुल गांधी यांनी भाजपवर चढवला. राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमकपणे आपलं भाषण केलं. राहुल गांधी यांच्या या भाषणातील काही शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर हे शब्द वगळण्यात आले आहेत.

राहुल गांधी यांनी काल दुपारी लोकसभेतील अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर भाषण केलं. त्यातील काही शब्दांवर आक्षेप घेण्यात आला होता. रात्री उशिरा राहुल गांधी यांच्या भाषणातील अनेक शब्द हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी नोटीसही जारी करण्यात आली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मणिपूरमध्ये भाजप फेल्युअर झाल्याचं म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली होती. ज्या शब्दांचा वापर करता कामा नये, असे शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. कामकाजातून हत्या, देशद्रोही आदी शब्द वगळण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस हरकत घेणार

दरम्यान, आता काँग्रेसकडून हा मुद्दा लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासमोर उपस्थित करणार आहेत. राहुल गांधी यांच्या भाषणात आक्षेपार्ह असं काहीच नाही. त्यामुळे असे शब्द हटवणे योग्य नाही, अंसही काँग्रेसने म्हटलं आहे.

ते शब्द हटवल्यानंतरचं राहुल गांधी यांचं भाषण

स्पीकर सर, त्यांनी मणिपूरमध्ये भारताची… केली आहे. केवळ मणिपूरचीच नाही तर, भारताचीही… केली आहे. यांच्या राजकारणाने मणिपूरलाच नव्हे तर भारताला मणिपूरमध्ये मारलं आहे. भारताची… केली आहे. भारताची मणिपूरमध्ये … केली आहे, असं राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. त्यांच्या भाषणातील ते वादग्रस्त शब्द वगळण्यात आले आहे. त्यानंतर राहुल गांधी म्हणतात, भारत आपल्या जनतेचा आवाज आहे. हृदयाचा आवाज आहे. त्या आवाजाची तुम्ही मणिपूरमध्ये… केली आहे. याचा अर्थ भारतमातेची… तुम्ही मणिपूरमध्ये केली आहे. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून भारतमातेची… केली आहे. तुम्ही… आहात, तुम्ही देशप्रेमी नाही. तुम्ही… आहात, तुम्ही देशाची मणिपूरमध्ये… केली आहे.

भाजप निशाण्यावर

कालच्या भाषणातून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपने मणिपूर हिंसेवर बोलण्यापूर्वी आपल्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. या यात्रेत काय पाहायला मिळालं? लोकांच्या काय अपेक्षा आहेत याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर त्यांनी मणिपूरच्या मुद्द्याला हात घालत भाजपवर जोरदार आगपाखड केली.