मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी डिसेंबरमध्ये मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमाीवर राहुल गांधी यांचा मुंबई दौरा निश्चित झाला होता. तसंच काँग्रेस स्थापना दिनी म्हणजे 28 डिसेंबर रोजी त्यांची मुंबईत सभाही घेण्यात येणार होती. मात्र, काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारनंच (Mahavikas Aghadi Government) राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली आहे! राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते चांगलेच नाराज झालेत आणि त्यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राहुल गांधी यांची 28 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये सभा घेण्यात येणार होती. महाराष्ट्र काँग्रेसकडून त्याबाबत जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसकडून मुंबई महापालिका, नगरविकास खात्याकडे सभेच्या परवानगीसाठी 15 दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, अद्यापही त्याला प्रतिसाद दिला गेला नाही आणि आता राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप नाराज झाले आहेत. तसंच काँग्रेसकडून आता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
राज्यात ओमिक्रॉनच्या फैलावाला सुरुवात झालीय. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आज 20 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील मुंबईत 5, कल्याण-डोंबिवली परिसरात 1 रुग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम, सभा आदींवर निर्बंध आणण्यात आले आहेत. या निर्बंधांचा फटका आता राहुल गांधी यांच्या सभेला बसल्याचं पाहायला मिळत आहे.
मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी परत मिळाव्यात या मागणीसाठी एमआयएमची तिरंगा रॅली धडकली होती. त्यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी जागोजागी अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. ओमिक्रॉनच्या नावाखाली आम्हाला मुंबईत येण्यापासून अडवलं जातं. मग ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता राहुल गांधींच्या रॅलीवेळीही कलम 144 लागू होणार का? असा सवाल ओवेसींनी केला होता.
तर ओवेसींच्या प्रश्नाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना याबाबत विचारलं असता, 144 कलम लागू करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्तांचा होता. आम्ही राहुल गांधी यांच्या 28 डिसेंबरला होणाऱ्या मुंबईतील रॅलीबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं, ते म्हणाले होते.
इतर बातम्या :