नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या विधानावरुन काँग्रेस पक्ष अनेकदा अडचणीत आला आहे. आता ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये असताना त्यांनी पुन्हा वाद निर्माण करणारे वक्तव्य केलं आहे. यामुळे ते व काँग्रेस अडचणीत आला आहे. देशाच्या लष्करी जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला नव्हता, ही कारवाई केल्याचा कुठलाही पुरावा नाही, असे वक्तव्य दिग्विजय (digvijaya singh)यांनी सोमवारी केले होते. यानंतर दिग्विजयसिंह यांच्यांवर भाजपकडून हल्लाबोल केला जात आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यासंदर्भात राहुल गांधी (rahul gandhi)यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी म्हणाले, लष्कराच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करता येणार नाही. लष्कराने काही केले तरी त्यावर पुराव्याची गरज नाही. दिग्विजयजींचे मत त्यांचे वैयक्तिक आहे. हे मला मान्य नाही.आमचा आमच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे.
जम्मूमध्येच मंगळवारी भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना प्रश्न विचारल्यावर सहकारी जयराम रमेश संतापले. दिग्विजय यांच्या सर्जिकल स्ट्राईकच्या वक्तव्यावर प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी जयराम रमेश आले आणि म्हणाले, पुरे झाले. तुम्ही आम्हाला जाऊ द्या. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तुम्ही पंतप्रधानांकडे जाऊन प्रश्न विचारा.
दिग्विजय सिंह पडले एकटे
काँग्रेसनेही दिग्विजय सिंह यांच्यांपासून वेगळी भूमिका मांडत त्यांचा चपराक दिली. सर्जिकल स्ट्राइकबाबत दिग्विजय सिंह यांचे विधान ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या विधानाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही, असे ट्वीट काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी केले. यामुळे पक्षात दिग्विजय सिंह पक्षामध्ये एकटे पडल्याचे दिसत आहे.