नवी दिल्ली : राज्यापाठोपाठ आता केंद्रातही शिवसेनेला (Shivsena) मोठा हादरा बसलाय. शिवसेनेच्या 40 आमदारांपाठोपाठ आता 12 खासदारही शिंदे गटात सहभागी झालेत. या खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत आपला वेगळा गट स्थापन करण्याची मागणी केलीय. त्यानंतर या आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कारही केला. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी गटनेतेपदी राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या नावाची घोषणा केली. तसंच मुख्य प्रतोद भावना गवळी राहतील असं जाहीर केलं. राहुल शेवाळे यांनी 12 खासदार शिंदे गटात का सहभागी झाले याचं नेमकं कारण सांगितलं.
21 जून रोजी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं पक्षासोबत राहू. पण तेव्हा सांगितलं भाजपसोबत निवडणूक लढवली आहे. आम्हाला अडीच वर्षे त्रास होतोय. त्यावेळी राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, सावंत उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोर उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपने तो निर्णय घेतला तर मी स्वागत करेल असं सांगितलं. त्याचं आम्ही स्वागत केलं. त्यानंतर पुन्हा बैठका झाल्या. तेव्हा पुढच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला. पण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढू म्हणून सांगितल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.
आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल असं आम्ही सांगितलं. तेव्हा मलाही युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करायचा खूप प्रयत्न केला असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदीसोबत बैठक झाली तेव्हा युतीबाबत मोदींकडे उल्लेख केला, युतीबाबत मोदींसोबत एक तास चर्चा झाली. जूनमध्ये बैठक झाली, जुलैमध्ये अधिवेशन होतं. त्यावेळी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे भाजप नेतृत्व नाराज झालं. एकीकडे युतीचं बोलणं होतंय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. त्याबद्दल भाजप श्रेष्ठीत नाराजी पसरली, असं शेवाळे म्हणाले.
शेवाळे यांनी सांगितलं की, दोन बैठका झाल्या होत्या. त्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रं दिलं. मार्गारेट अल्वा महाराष्ट्राच्या प्रभारी असताना त्या चार वर्षात त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं उचित वाटलं नाही. उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी रिस्पॉन्स आला नाही आणि राऊतांनी महाविकास आघाडीच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, असं शेवाळे यांनी स्पष्टच सांगितलं.