लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जागावाटपाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. कोणाला कोणत्या जागेवरून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून सात जणांना संधी दिली आहे. काँग्रेसने गुरुवारी 57 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवार आहेत. तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांची नाव चर्चेत आहेत. त्यातही स्वरा भास्करचं नाव आघाडीवर आहे. स्वराने नुकतीच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची दिल्लीत भेट घेतली होती. उत्तर मध्य मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
स्वरा भास्करने रमेश चेन्नीथला यांची काँग्रेसच्या मुख्यालयात भेट घेतली. या दोघांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चर्चा झाली. त्यामुळे उमेदवारीसाठी स्वराचं नाव आघाडीवर आहे. स्वरा सोशल मीडियावर बेधडकपणे तिची मतं मांडताना दिसते. अनेकदा तिने तिच्या पोस्टद्वारे सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तिच्या उमेदवारीविषयी पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून जाहीर झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजीराव काळगे, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे, नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज, अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे, पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर, नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने गुरुवारी जाहीर केलेल्या 57 जणांच्या यादीत महाराष्ट्रातील 7, कर्नाटकमधील 17, गुजरातमधील 11, राजस्थानमधील 6, तेलंगणामधील 5, आंध्र प्रदेशमधील 2, पश्चिम बंगालमधील 8 आणि पुद्दुचेरीमधील एक उमेदवाचारा समावेश आहे.
पुणे- रविंद्र धंगेकर
कोल्हापूर- छत्रपती शाहू महाराज
सोलापूर- प्रणिती शिंदे
लातूर- शिवाजी कालगे
नांदेड- वसंतराव चव्हाण
नंदुरबार- गोवाल पाडवी
अमरावती- बळवंत वानखेडे