मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिलाय. सरकारनं भोंगे हटवले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी दिले आहेत. औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेदरम्यान राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांकडून राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्य सरकार मनसेचा ‘भोंगा अजान’ हा चित्रपटही राज्य सरकार प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केलाय.
अमेय खोपकर यांच्या हस्ते ‘भोंगा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून आजवर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्याच दिवशी भोंगा सिनेमा प्रदर्शित करण्याची घोषणा खोपकर यांनी केली होती. मात्र, हा सिनेमा सरकार प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप खोपकर यांनी आज केलाय. ‘राज्य सरकार हुकूमशाहसारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेगायदेशीर कामं करायला स्वत: गृहखातं सांगतंय’ असं ट्वीट खोपकर यांनी केलं आहे. ‘जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?’ असा सवालही खोपकर यांनी विचारलाय.
मनसेने निर्मिती केलेला भोंगा हा सिनेमा आज राज्यातील 65 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र पोलिसांनी चित्रपट गृह मालकांना फोन करुन चित्रपट प्रदर्शित करु नये, अशा सूचना केल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे.
राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
भोंगा या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केलं आहे. यामध्ये अभिनेत्री दिप्ती धोत्रे, कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, अरुण गीते, सुधाकर बिराजदार, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळाला दुर्धर आजार झालेला असतो. या आजारामुळे बाळाला उच्च ध्वनीचा अधिक त्रास होतो. भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होऊन त्याचा त्रास वाढत जातो. हा त्रास संपूर्ण गाव पाहत असतो आणि तो कमी करण्यासाठी ते काय पाऊल उचलतात हे या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.