औरंगाबाद : “औरंगाबादचं संभाजीनगर झालं तर हरकत काय? चांगल्या गोष्टींसाठी बदल आवश्यक असतात. अनेक लोकांनी अनेक गोष्टींमध्ये बदल केले. अनेक लोक आपल्या भूमिका सोडून सत्तेत आले”, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला लगावला. राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा आज त्यांचा दुसरा दिवस आहे. त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला (Raj Thackeray slams Shiv sena and BJP).
“मी कुठलीही भूमिका बदलली नाही. पाकिस्तानी कलावंताना हाकलून देण्याचं काम आम्ही केलं. जे स्वत:ला हिंदू म्हणून घेतात त्यांनी हाकललं का? रझा अकादमीविरोधात मोर्चा कोणी काढला? झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली असं होत नाही. ज्या प्रकारची कृती आवश्यक आहे ती कृती फक्त माझ्याच पक्षाकडून झाली. तेव्हा बाकीचे पक्ष कुठे गेले होते?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा हा मी पाच ते सहा वर्षांपूर्वीच आणला आहे. तो झेंडा अधिकृतपणे जाहीर करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरु होती. या झेंड्याचं अनावरण करण्यासाठी अधिवेशन ठरवलं. निवडणूक आयोगाला या झेंड्याबाबत तीन चे चार वर्षांपूर्वी माहिती दिली होती. याशिवाय झेंड्याबाबत दोन महिन्यांपूर्वीच अधिकृत पत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिलं. पक्षाची भूमिका गेल्या 14 ते 15 वर्षांपासून मांडतच आलो. दूसरे जी भूमिका मांडत नव्हते ती भूमिका स्पष्टपणे मांडली”, असे राज ठाकरे यांनी सांगितलं.
“महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. मात्र त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असतात. ईव्हीएमकडून नोटीस बजावण्यात आली. त्यावेळी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो होतो. मात्र आपल्याकडे भेटीचे रुपांतर लगेच मैत्रीत होतं आणि लगेच चर्चा सुरु होते. असं नसतं, संबंध हे प्रत्येकाचे असतात. आताचं तुम्ही महाराष्ट्रातलं सरकार पाहिलंत तर मला असं वाटतं की त्यांची वेगळीच मैत्री झाली आहे”, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला.
“हिंदुत्व म्हणजे विकासाकडे लक्ष नाही, असं नसतं. एखादं शहर बदलणं हा फक्त राजकीय अजेंडा नाही तर ते माझं पॅशनसुद्धा आहे. जगभरातील शहरं मी फिरलो तर आपल्या महाराष्ट्रातही अशी शहरं असावी असं मला वाटतं. नाशिकमध्ये काय केलंय ते बघा”, असे राज ठाकरे म्हणाले (Raj Thackeray slams Shiv sena and BJP).