औरंगाबाद : राज्यात हिंदुत्वावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची मोठी कोंडी करत आहेत. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा आज औरंगाबादेत होत आहे. राज ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, राज ठाकरे यांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा काही संघटनांनी दिलाय. भीम आर्मीच्या (Bhim Army) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना संविधान भेट देणार असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं उल्लंघन केल्यास सभा उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिलाय. याबाबत मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी या संघटनांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही सभा उधळायला याल तर आम्ही तुम्हाला मारण्याची गरज नाही. ही गर्दीच तुम्हाला चिरडून टाकेन, थेट इशारा जाधव यांनी दिलाय.
भीम आर्मी आणि अन्य काही संघटनांनी राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिलाय. त्याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांना विचारलं असता, संविधानाचं स्वागतच आहे. मात्र, सभा उधळून लावण्याच्या धमक्या किंवा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आम्ही मारण्याची गरज नाही. तुम्ही या सभेत चिरडून मराल, असा इशाराच त्यांनी दिलाय. त्याचबरोबर तुम्ही विरोध करत असाल तर पुढील सभा आम्हाला तुमच्या घरासमोर घ्यावी लागेल, असंही जाधव म्हणाले.
भीम आर्मीकडून राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादकडे जाणार होते. भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईवरुन औरंगाबादच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. भीम आर्मीचे पदाधिकारी राज ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट देणार होते. राज ठाकरे संविधान मानत नाहीत. त्यामुळे त्यांनी संविधान भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं राज ठाकरेंनी उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी अशोक कांबळे यांना ताब्यात घेतलं आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अगदी शेवटच्या वेळी अटीशर्थींसह परवानगी दिलीय. महत्वाची बाब म्हणजे पोलिसांनी या सभेसाठी 16 अटी घातल्या आहेत. असं असलं तरी राज ठाकरे यांच्या आजच्या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. तसंच मशिदींवरील भोंगे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक भूमिका मांडण्याची शक्यता आहे. संपुर्ण महाराष्ट्राला राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता लागली आहे.