मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजही राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटून मोदी-शाह जोडगोळीवर फटाकारे ओढले आहेत. ‘चिंतन’ असे या व्यंगचित्राला नाव दिले आहे.
काय आहे व्यंगचित्रात?
पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ‘चिंतन’ बैठक सुरु असल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्रात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे व्यंगचित्रात चर्चा करताना दिसत असून, हे दोघेच भाजपचे वरिष्ठ नेते असल्याचे यातून टोला लगावला आहे. शिवाय, हे दोघेही कालच्या निकालानंतर एकमेकांची तब्येत तपासताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हे चौघेजण या दोघांच्या मागे उभे राहून हसताना दिसत आहेत.
तसेच, मोदी आणि शाह यांच्या आजूबाजूला भाजपा आणि पेड भक्त दाखवण्यात आले असून, ते मातीत डोके खुपसून उभे असल्याचे दिसत आहे. अत्यंत बारिक-सारिक गोष्टींमधून राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडगोळीसह भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, काल पाच राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने निकालात भाजपने सपाटून मार खाल्ल्याचे चित्र दिसून आले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचली, तर मिझोराममध्ये एमएनएफ आणि तेलंगणात टीआरएस विजयी झाली. कुठेच भाजपला य़श मिळवता आले नसल्याने, मोदी लाट ओसरल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ‘तडा’ नावाचे व्यंगचित्र काल रेखाटले होते. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
#BJPchintan #AssemblyElectionsResults2018 #MadhyaPradesh #Rajasthan #Telangana #Chhatisgarh #Mizoram #PaidBhakta #NarendraModi #AmitShah #LalKrishnaAdvani #NitinGadkari #SushmaSwaraj #RajnathSingh pic.twitter.com/vQ13jfmPGB
— Raj Thackeray (@RajThackeray) December 12, 2018