मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीवरील बंदीवरुन सरकारवर सडकून टीका केलीय. सरकारने कितीही निर्बंध लावले तरी आम्ही सण साजरा करणार. काय होईल ते बघू, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलबाजी केली. जसे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते मोजत नाहीत, तसेच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही, म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही. हे सर्व सूडबुद्धीने सुरु आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस होऊदे, आम्ही बैठक घेऊन मंदिराची भूमिका घेऊ, मंदिराबाहेर घंटानाद करु. नियम सर्वांसाठी एक लावा, वेगवेगळे नको.”
“सर्व काही सुरु आहे. नारायण राणेंबाबतीत झालं, हाणामाऱ्या झाल्या, भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला, यांच्यासाठी सगळं सुरु, फुटबॉल, क्रिकेट सुरु आहे, आम्ही दहीहंडी करायची नाही का?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
राज ठाकरे म्हणाले, “बाहेर पडायला यांची फाटते, त्यात आमचा काय दोष? हे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे.”
राज ठाकरे म्हणाले, “ठाण्यात परप्रांतीय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल. यांची हिम्मत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.”
“यांची हिम्मत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधणं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिम्मत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल,” असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
Raj Thackeray criticize Government over police FIR on MNS activist