दापोली : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनीही आज तीच भूमिका मांडली. सध्या राजकारणात जे काही सुरू आहे. त्यामुळे कुणाबरोबर मी जाईल हे मला वाटत नाही, असं सांगून राज ठाकरे यांनी कोणत्याही युती आणि आघाडीची शक्यता फेटाळली आहे. राज ठाकरे यांनी स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच लोकसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक असते. या निवडणुकीत एकच भूमिका असते. एका जिल्ह्यासाठी एक आणि दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसरी असं काही नसतं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काल ते चिपळूणला होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना संघटना बांधणीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. राज ठाकरे आज दापोलीत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना कुणाशीही युती किंवा आघाडी करणार नसल्याचं स्पष्टच सांगून टाकलं. तसेच येत्या 10 ते 15 दिवसात मी मेळावा घेणार आहे. यावेळी मी जे काय आहे ते स्पष्ट सांगणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलतात? भाजप आणि राष्ट्रवादीच्या घरोब्यावर काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका होत नाहीत, त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य करत तीव्र संताप व्यक्त केला. कुणाच्या हातात काय राहिले? मला कळतच नाही. हम करे सो कायदा सुरू आहे. अजूनही निवडणुका होत नाहीत. दोन दोन-तीन तीन वर्ष निवडणुका प्रलंबित आहेत. हे गंभीर आहे. त्यावर कोणी बोलत नाही. चालढकल सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोबाईल नावाचं माध्यम आलंय. पूर्वी लोक राग व्यक्त करायचे आणि रस्त्यावर उतरायचे. आता लोक मोबाईलवर राग व्यक्त करत आहेत. त्या मोबाईलवरील प्रतिक्रिया राजकारणी पाहत नसतात. ते फक्त शांत जनता पाहतात. कारण जनता मोबाईलवर राग व्यक्त करून मोकळी झालेली असते. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत हे लोक वठणीवर येणार नाहीत, असंही ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येतात यात नवीन काय? असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी मनसेची बांधणी कशी करणार याकडेही लक्ष वेधले. दर महिन्याला कार्यशाळा सुरू राहतील. कार्यक्रम कसे राबवले जातात, कोण किती काम करतंय हे पाहूनच ते लोक पदावर राहतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.