मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात धुमश्चक्री सुरु आहे. शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिमेला जोडो मारले, शाईफेक केली. इतकंच नाही तर नाशिक आणि ठाण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर दगडफेक केली. नाशिक पोलीस आणि पुणे पोलिसांचं पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी कोकणात रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती, असं टोकाचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड, महाड, नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, या सर्व राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघात काहीकाळ चर्चा झाली . राज्यातील आजच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा झाली. जे काही सुरू आहे ते व्हायला नको होतं, चुकीच्या पद्धतीने सर्व काही होत आहे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडल्याची सूत्रांची प्राथमिक माहिती. राज ठाकरे सध्या तरी या विषयावर अधिकृतपणे बोलणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांना कानाखाली खेचण्याची भाषा, नारायण राणेंचं वक्तव्य जसंच्या तसं
‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांची भाषा पुन्हा एकदा घसरलीय. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा राणेंनी केलीय. राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत. त्याच वेळेस राणे महाडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आता नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. राणेंवर राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी, फडणवीसांकडून भूमिका जाहीर