संदीप शिंदे, माढा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत आणि ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. महाराष्ट्रात जातीवादाचं विष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तसंच शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केला होता. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरुनही राज यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तसंच इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांचं नाव घेत त्यांच्यावरही टीका केली होती. त्यावरुन आता श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. कोण ते कोकाटे समजून घेण्यासाठी राज ठाकरेंनी माझं भाषण ऐकायला यावं, असा खोचक सल्लाही कोकाटे यांनी राज ठाकरेंना दिलाय.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, कोण कोकाटे ते समजून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी माझं भाषण ऐकायला यावं. तसंच कोकाटेच्या वर्गाला येऊन बसावं म्हणजे त्यांना समजेल कोकाटे कोण ते, असं आव्हानच कोकाटे यांनी राज यांना दिलंय. राज ठाकरे यांना खरं शिवचरित्र माहिती नाही. त्यांनी पुरंदरे भक्तीतून बाहेर पडावं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकं वाचण्याची गरज आहे, म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने कोकाटे यांच्या भाषणाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं.
कोकाटे पुढे म्हणाले की, कोणत्याही टीकेला आम्ही घाबरत नाही. जो कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करेल त्यांच्याविरोधात लढणार. बाबासाहेब पुरंदरे यांनी आतापर्यंत जातीवादी, जमातवादी, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचं काम केलं होतं. शिवाजी महाराज, शहाजीराजे, माँसाहेब जिजाऊ यांचे चरित्रहनन करण्याचं काम पुरंदरेंनी केलं. चुकीचा इतिहास मांडणाऱ्या विकृत व्यक्तीच्या प्रेमात अडकल्यामुळे राज ठाकरे संभ्रमित झाले आहेत, अशी खोचक टीकाही कोकाटे यांनी केलीय.
पवार साहेबांचं एक भाषण पाहिलं. अफलखानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला त्यात हिंदू-मुस्लिम असा काही वाद नव्हता म्हणे. मग पवारसाहेब तो कशासाठी आला होता? तो केसरी टूर्स आणि विणा वर्ल्डचं तिकीट घेऊन आला होता का महाराष्ट्र दर्शन करायचं म्हणून? छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा हातात भगवा ध्वज घेतला होता. हिरव्या झेंड्याविरुद्धची भगव्या झेंड्याची लढाई तुम्हाला कधी दिसली नाही का? पवार साहेब स्वत: नास्तिक आहेत. ते क्वचितच कुठल्या मंदिरात हात जोडताना दिसतील. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अपेक्षित असलेलं. मग त्यात बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला, कोणत्या पानावर कोणत्या ओळीत सांगितला ते सांगा ना. यांचे इतिहासकार कोण तर कोकाटे.. कोण कोकाटे? शिवाजी महाराजांचा इतिहास अनेकांनी लिहिला. पण घराघरात शिवाजी महाराज कुणी पोहोचवले असतील तर ते आमचे बाबासाहेब पुरंदरे. हे नाकारून चालणारच नाही तुम्हाला. पण आम्हाला इतिहास नाही तर ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसाने लिहिलं ते पाहायचं आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पवारांवर आणि कोकाटे यांच्यावर हल्ला चढवला होता.
इतर बातम्या :