मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना पत्रं लिहिलं. त्यानंतर भाजपचे (bjp) अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल (murji patel)यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेलं पत्रं हा स्क्रिप्टचा एक भाग होता, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले होते. यावेळी कोर्ट परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेलं पत्रं स्क्रिप्टचा भाग होता. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपनं वैयक्ति सर्वे केला होता. ठाकरे गट मोठ्या फरकाने जिंकेल हे भाजपला कळलं होतं. पराभवाची चाहूल लागल्याने भाजपने उमेदवार मागे घेतला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबाबतची घोषणा केली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण झालेली आहे. अपेक्षित मते मिळवून भाजपा ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहे. पण, एखाद्या आमदाराचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी निवडणूक लढवत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्रात संस्कृती आहे. भाजपाने यापूर्वी अनेकदा असा निर्णय घेतला आहे. तसेच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराला जेमतेम एक दीड वर्ष कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आज पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
हा निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतला आहे. राज्यासाठी संवेदनशील निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे आपण आभार मानतो, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं आवाहन केलं होतं. त्यानुसार भाजपच्या कालपासून बैठका पार पडल्या. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही याबाबत चर्चा केली. त्यानंतर दुपारी भाजपने आपला निर्णय जाहीर केला.