मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची मुबंईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा दावा करत एक व्हिडीओ दाखवला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं त्याबद्दल अभिनंदन
मुख्यमंत्री तुमच्याकडे शिवसेना नाव आहे. मशिदींवरील भोंगे बंद करा. सतरा हजार मनसैकांवर या मुद्द्यावरुन दाखल झालेले गुन्हे मागे करा. एक तर तुम्ही सांगा की लाऊडस्पिकर बंद करा. नाहीतर दुर्लक्ष करा, आम्ही लाऊड स्पिकर बंद करतो. दोघांपैकी एक निर्णय शिंदे सरकारला घ्यावा लागेल. मी विषय सोडलेला नाही. मी मुद्दाम हा विषय काढला. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो महाराष्ट्रातील गोष्टींकडे लक्ष द्या.
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रशासनाचं दुर्लक्ष असलं ना राज्यकर्त्याचंं दुर्लक्ष असलं तर काय घडू शकतं, कारण सगळ्याचंं राजकारणाकडे लक्ष, पण गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागात एकाकडे गेलो होतो. समोर पाहिलं तर मला समुद्रात लोकं दिसली. काय ते समजेना. मी एकाला सांगितलं की बघ रे काय ते. मग त्या माणसाने ड्रोन शूट करुन माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. प्रशानाचं दुर्लक्ष असल्यावर काय घडू शकतं, या गोष्टीचे गैरफायदे कशाप्रकारे घेतले जातात, तुमचं लक्ष असलं पाहिजे कोणत्या गोष्टी होतायत, जो घटना मानणारा मुसलमान यांना विचारणार आहे जे मी दाखवणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का. मी हे दाखवण्याआधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मुंबई मनपाचे आयुक्त, मुंबई पोलीस खात्याचे कमिश्नर विवेक फणसाळकर माझी सगळ्यांना विनंती आहे की, यावर जर समजा तुमची कारवाई होणार नसेल त्यानंतर महिनाभरानंतर काय होईल ते पाहिल्यावर मी सांगेल. हे माहीम आहे.
हे इतिहासकालीन दर्गा. त्याच्या पुढे अनधिकृतपणे समुद्रात उभं केलं. माहिम पोलीस स्टेशन जवळ आहे. लक्ष नाही. महापालिकाचे लोकं उभे असतात. पण पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजी अली तयार करणार? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिश्नर, महापालिका आयुक्तांना आजच सांगतो महिन्याभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाहीत. वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. एकदा माझ्याकडे राज्य आलं तर आख्खं राज्य सुतासारखं सरळ करेन. परत कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही.
तुमची ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. खरंतर गरज नाही. पण दाखवावी लागणार. मुसलमान समाजाला हे मान्य आहे का? कुणाची समाधी आहे ती, माशाची? हे दाखवण्यासाठी हा स्क्रिन लावला होता.
येणारी राम नवमी जोरात साजरी करा. येत्या ६ जूनला आपल्या शिवछत्रपतींच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. मी स्वत: रायगडावर जा. दक्ष राहा, बेसावध राहू नका. आजूबाजूला काय घडतंय यावर पाळत ठेवा. आज बेसावध राहिलं तर पायाखालची सगळी जमीन चालली जाईल ते कळणार नाही. दक्ष राहा. शासनावर अंकूश ठेवा.
मी एप्रिलमध्ये माझ्या कोकणातील सभा घेणार आहे. मी त्यांच्या मागे जात नाहीय. पण आधी जाहीर झालेल्या सभांना जाईन. सगळ्यांचे आभार मानतो. महिलांना वाट मोकळी करुन जावं.
2019 ची निलवडणूक संपली आणि आकडेवारी आली. निवडणुकीत अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपदाबद्दल तुम्ही बोलला होतात? चार भींतीत म्हणे अमित शाह यांनी सांगितलं. जाहीरपणे का नाही सांगितलं? नरेंद्र मोदी, अमित शाह सांगत होते की, पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तेव्हा आक्षेप का नाही घेतला? ज्यावेळेला यांचं सरकार बनत नाही ते पाहिलं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्याआधी अजित पवारांनी भाजपसोबत शपथविधी केला. काकांनी डोळे वटारले. मग प्रेम प्रकरण नेस्तारलं. हे सगळं थेरं चालण्यासाठी तुम्ही मतदान करता? मागच्या गुढीपाडव्याच्या सभेत बोललो आणि जूनमध्ये झाला तमाशा. अलिबाग आणि त्यांचे 40 जणं गेली. त्यांना मला चोर म्हणता येत नाही. कारण ते चोर नाहीत.
कोरोना काळात मुख्यमंत्री भेटायला तयार नाही. कुणालाही भेटत नव्हते. आता अचानक बाहेर पडले. 21 जूनला समजलं की, एकनाथ शिदे आमदार घेऊन सूरतला गेले आणि पुढे गुवाहाटीला. महाराज सूरतहून लूट करुन महाराष्ट्रात आलेले. महाराष्ट्रातून लूट करुन सूरतला गेलेले हे पहिलेच. एकनाथ शिंदे मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसले आहात, महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे सभा घेतात तिथे सभा घेऊ नका. महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्राचे किती प्रश्न आहे. पेन्शनचा विषय मिटवा. शेतकऱ्याचे विषय आहे. अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यांना भेटा. सभा कसल्या घेताय. किती प्रश्न पडलेले आहेेत. सध्या सुशोभिकरण सुरु आहे. जेवढे दिव्याचे पोल आहेत त्याला लाईट लावले आहेत. रात्री डान्सबार आहे की रस्ते कळत नाही. असं सुशोभीकरण आहे काय? ही लायटींग लावायची पद्धत आहे का? जगामध्ये तुम्ही जाता तेव्हा बघा किती स्वच्छ शहरे असतात. सशोभीकरणाच्या नावाखाली 1700 कोटींचे खर्चे केले. ते काही कायमचे आहेत का? ते जाणार मग नवीन लावणार
अहो आपण कोण आहोत? आपण महाराष्ट्राचे नागरीक आहोत. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं त्या राज्याला प्रबोधन करण्याची वेळ आलीय. महाराष्ट्र चाचपडतोय. आज हे गेले उद्या ते आले, उद्या ते गेले मग हे आले. कशाप्रकारचं राजकारण महाराष्ट्र बघतोय. नवीन उद्योग येताना दिसत नाही. बरोजगारी आवासून उभी आहे. शेतकरी, महिला सरकारकडे बघत आहेत. सरकार कोर्टाकडे बघत आहेत. असं कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी कधी बघितलेलं नाही. आताची परिस्थिती पाहून आताच निवडणुका लावा. जो काही सोक्षमोक्ष तो आताच होऊन जाऊदे. जो काही चिखल केलाय तो तुमच्या तोंडात घातला तर बघा. मुख्यमंत्री नवीन आहेत, ठिक आहे, समजू शकतो. करा काम नीट. एवढ्या गोष्टी आहेत.
मला काल विचारलं तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? आजचा हिंदू नववर्ष. माझ्या हिंदुत्वात मला धर्मांध हिंदुत्व नको. धर्माभिमानी हिंदू हवाय. जो इतर धर्मांचाही मान राखेल. मला मुस्लिम धर्मातीलही माणसं पाहिजेत. मला जावेद अख्तर साहेबांसारखे माणसं पाहिजे. त्यांनी पाकिस्तानात जावून खडेबोल सुनावलं. द्वेषाने बघण्यासारखं नसतं. पण जिथे कुरापती काढल्या जातात तिथे त्याच पद्धतीने उत्तर द्यायला हवा. मला अपेक्षित असलेला मुसलमान पाकिस्तानला खडेबोल सुनावणारा पाहिजे.
राज ठाकरे यांनी जावेद अख्तर यांची पाकिस्तानातली क्लिप दाखवली
पाकिस्तानाता जाऊन आमच्या शहरात जो हल्ला झाला तो आम्ही विसरणार नाहीत. असं बोलणारी माणसं मला हवी आहेत. जे सांगतील चालूय तशी माणसं नकोय. मला मध्यंतरी पत्र आलं. मंगलमूर्ती कॉलनी येथे बहुतांश लोकं हिंदू राहतात. इथे मंगलमूर्ती कॉलनी वसलेली आहे. या भागात काही क्षेत्र आरक्षित आहे. पण सदर जागेबाबत बनावट कागदपत्रे तयार करुन अब्दुल, राजू शेख लोकांनी जागेवर दावा केला. विरोध केल्यास त्रास द्यायला सुरवात केली, पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही. सदर जागेत या लोकांनी मोठे पत्र लावले आहेत, असं पत्र राज ठाकरे यांनी वाचलं. मशिदीच्या दाव्यावरुन वाद अशी बातमी आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
बऱ्याच काळानंतर बोलतोय. अनेकांनी मला विचारलं की, एवढे मोठे स्क्रिन कशासाठी लावले आहेत? मी म्हटलं, भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहेत. काहीतरी उद्देश असेल म्हणून तर लावले ना? पण आज शिवतीर्थाचा कोपरा न कोपरा भरलेला मला दिसतोय. अनेकांनी सांगितलं होतं की हा संपलेला पक्ष आहे. हा? जे बोलले त्यांची अवस्था काय? आज महाराष्ट्राची एकूण राजकीय स्थिती पाहतोय. गेल्या काही दिवसांमध्ये आपण राजकारणाचा झालेला खेळ, बट्ट्याबोळ, सर्वच पाहत आलोय. हे सगळं पाहत असताना वाईट वाटत होतं. पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं, माझं का तुझं हे ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला वेदना होत होत्या. जितकी वर्ष लहानपणापासून पक्ष पाहत आलो, पाहत काय आलो तो पक्ष जगलो. मला आजही आठवतंय की, मी दुसरीत असताना माझ्या शर्टाच्या खिशावर तो वाघ असायचा. तोही बरोबर डाव्या बाजूला असायचा
राजकारण लहानपणापासून पाहत आलो, अनुभवत आलो बाळासाहेबांबरोबर. असंख्य लोकांबरोबर उभी केलेली संघटना आणि पक्ष, मी ज्यावेळेला पक्षातून बाहेर पडलो, त्यानंतर माझं इथे ज्यावेळेला भाषण झालेलं तेव्हा म्हटलं होतं की, माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेही म्हटलं होतं की, ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार. खड्ड्यात घातल्यानंतर मी त्याचा वाटेकरी होऊ इच्छित नाही म्हणून मी बाहेर पडलो.
आज हे सगळं राजकारण पाहिल्यानंतर टेलिव्हिजनचे सिरिजचे रिकॅप येतात, अगोदर काय झालं ते सांगतात मग पुढचा भाग दाखवतात. २००६ ला मी पक्ष स्थापन केला. मी त्या संपूर्ण भाषणात काय झालं, कशामुळे झालं तो चिखल मला करायचा नव्हता, आजही करायचा नाही. पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या की राज ठाकरेला शिवसेना प्रमुख पद पाहिजे, अख्खा पक्ष पाहिजा होता, पण हे झूठ होतं. ते माझ्या स्वप्नात कधी आलं नाही. कारण तो नुसता धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्य होता. बाळासाहेब ठाकरेंशिवाय कुणाला झेपणार नव्हता. एकाला झेपणार नाही मग दुसऱ्याला झेपेल का ते माहिती नाही.
मला घरातल्या गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. त्यांच्या बाजूच्या लोकांना आधीच सांगून ठेवतो की, मी बोलल्यानंतर उद्या तोंड उचकटू नका. कारण त्यानंतर मी जे बोलेल ते तुम्हाला झेपणार नाही. मला फक्त दोन घटना सांगायच्या आहेत. तुम्हाला फक्त महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. त्याअगोदर काय गोष्टी घडल्या सांगतो. आताची परिस्थिती का ओढवली त्यासाठी सांगतोय. मला भींतीकडे दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. पण मला काही फरक पडत नव्हता.
मी एकेदिवशी उद्धवकडे गेलो. गाडीत बस मला तुझ्याशी बोलायचं आहे. हॉटेल ऑबेरॉयला गेलो. मी त्याला समोर बसवलं. मी हे जे सांगतोय, शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगतोय, मी समोर बसवून काय हवं ते विचारलं. पक्षाचं अध्यक्ष व्हायचंय? तर हो, मुख्यमंत्री व्हायचं? तर हो. तुला जे व्हायचं ते हो. मला फक्त सांग माझं काम काय? मला फक्त प्रचाराला तुम्ही ठेऊ नको. एरव्ही आतमध्ये ठेवायचं आणि प्राचाराला काढायचं. मला काही प्रोब्लेम नाही म्हणाला.
आम्ही घरी आलो. बाळासाहेब झोपले होते. मी त्यांना उठवलं आणि सांगितलं की सगळा प्रोब्लेम सॉल्व झालाय. सगळं मिटलं. मी उद्धवशी बोललोय. उद्धवला बोलवलं पण ते बाहेर निघून गेले असं सांगितलं. या सगळ्या गोष्टी मी बाहेर कधी जाईन यासाठी चालू होत्या.
नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी साहेबांशी बोलतो जाऊ नका. मला बोलले बोला तुम्ही साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन केला. त्यांची इच्छा नाहीय. जाऊ देऊ नका. मला म्हणाले, लगेच घरी घेऊन ये. मी नारायणरावांना फोन केला. लगेच या आपल्याला साहेबांकडे जायचंय. ते तिकडून निघाले आणि मला बाळासाहेबांचा फोन आला. अरे नको बोलवूस. मला मागून आवाज येत होता. काही नाही. मला सांगावं लागलं की, येऊ नको. ज्याप्रकारे लोकांना बाहेर काढण्याचं राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा. त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो. पण जे नाव मी पाहत आलो ते टांगताना दिसलं तेव्हा त्रास झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा पक्ष काढायचा हे मनातही नव्हतं. बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा? या अशा परिस्थितीत लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले महाराष्ट्र फिरा. मी महाराष्ट्र फिरलो आणि प्रतिसाद पाहिला.
अनेक गोष्टी झाल्या. राजकारणात बाहेरुन, घरातून सगळीकडून झाल्या. आज हे जे राजकारण चालू आहे ना, आज बाळासाहेब ठाकरे असते तर हे होऊ दिलं असतं का? सहानुभूती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं आणि याने हे केलं ते केलं सांगायचं. यांनी ताय शेण खाल्लं?
मुंबई :
संदीप देशपांडे यांची नेतेपदी निवड
अविनाश जाधव, राजू उंबरकर याची नेतेपदी निवड
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची सरचिटणीसपदी नियुक्त
उपाध्यक्ष योगेश परुळेकर यांची सरचिटणीसपदी नियुक्त
बाळा शेडगे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती
गणेश सातपुते यांची सरचिटणीसपदी नियुक्ती
पराग शिंत्रे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई :
जाहीरात क्षेत्रातील मोठे दिग्गज भरत दाभोळकर यांचा मनसेत प्रवेश
इतका मोठा जनसागर पाहून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आळी, भरत दाभोळकर यांची प्रतिक्रिया
मुंबई :
गायक अवधूत गुप्ते यांच्याकडून मनसेचं नवं गाणं प्रदर्शित
राज ठाकरे मंचावर उपस्थित
मुंबई :
राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर दाखल
कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु
संदीप देशपांडे यांच्या भाषणातील मुद्दे :
मनसे पक्षाने गेल्या सतरा वर्षात संघर्ष केला
मनसेला निवडणुकीत यश येवो किंवा अपयश येवो महाराष्ट्र सैनिक कधी खचला नाही
अपयशाला खचू नका आणि यश आल्यावर माजू नका, अशी शिकवण
‘ज्यावेळी अमित ठाकरे आजारी होते तेव्हा आमचे नगरसेवक फोडले तेव्हा लाज नाही वाटली?’, संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
ठाणे :
मनसे कार्यकर्त्यांच्या बस ठाण्याहून मुंबईच्या दिशेला रवाना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची बस मुंबईला रवाना
ठाण्याच्या आनंद नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी घोषणाबाजी केली
राज ठाकरे यांच्या सभेआधी मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया :
– राज ठाकरे विचार आणि वारसा दोन्हींचे खरे वारसदार
– इतरांनी विचार वारसा सगळं सोडलेला आहे
– आम्ही हाच संकल्प करणार की आमच्या जास्त जागा निवडून आल्या पाहिजे
– सगळे भोंगे अद्याप उतरले नाहीत, १० टक्के बाकी आहेत, आज राज ठाकरे यावर बोलतील
– राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात
मुंबई :
शिवाजीपार्कवर राज ठाकरे यांच्या सभेसाठी आता कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
अवघ्या काही तासात सुरू होणाऱ्या सभेसाठी कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी जमायला सुरवात झाली आहे.
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, राज्यातील राजकीय घडामोडी यावर राज ठाकरे निश्चित समाचार घेतील, असा विश्वास मनसे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत
रायगड :
राज ठाकरे यांची आज दादर येथे सभा असून या सभेसाठी मोठ्या प्रमाणात कर्जत येथून मनसे सैनिक दादरला रवाना होत आहेत
मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या सभेसाठी कर्जत ते दादर अशी विशेष लोकल ट्रेन आयोजित करण्यात आली आहे