मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलं. त्यानंतर आता औरंगाबादेतील (Aurangabad) सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 116, 117, 153 आणि सहकलम 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर राज्यभरातील 15 हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती दिलीय. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळतेय!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानावर बैठक झाल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं पालन करा असा आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी वर्षावर झालेली ही बैठक आता चर्चेचा विषय ठरत आहे.
राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण आणि वैयक्तिक टीका केल्या प्रकरणी कलम 116, 117, 153 आणि सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भव्य सभा झाली होती. पोलिसांनी या सभेसाठी एकूण 16 अटी घातल्या होत्या. त्यातील एका अटीत 15 हजार लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, राज यांच्या सभेला 1 लाखा पेक्षा अधिक लोक उपस्थित असण्याचा अंदाज आहे. तसंच राज यांना वैयक्तिक टीका नको अशीही अट घातली होती. मात्र, या दोन्ही अटींसह एकूण 12 अटींचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. यंत्रणा सक्षम आहे. नेतृत्व सक्षम आहे. सरकार सक्षम आहे. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती सर्वात मोठी चूक करतील आणि स्वत: एक्सपोज होतील, असा इशाराही राऊत यांनी दिला. मुख्यमंत्र्यांकडे विविध बैठका असतात. शासकीय बैठकीत काय होतं, काय नाही हे मी सांगणार नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक यांची पावलं योग्य दिशेने पडत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.