मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : अचानक पावसाचं काय सुरू झालं ते कोणालाच कळत नाही. कारण सध्या सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कधी कोसळतील हे कळत नाही, असा मिश्किल टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. गोरेगाव येथील मुलाखतीच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पावसामुळे मुलाखत देण्यास नकार दिला. आमच्या डोक्यावर छप्पर आहे. तुमच्या डोक्यावर नाही. पाऊस सुरू आहे. त्यामुळे मी मुलाखत देऊ इच्छित नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
गोरेगाव येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण संध्याकाळी अचानक पावसाने सुरुवात केली. नागरिकांना पावसातच थांबावं लागेल म्हणून राज ठाकरे यांनी मुलाखत देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी सरकार आणि पाऊस कधी कोसळेल हे सांगता येत नाही, असा चिमटा काढला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
दरम्यान, आज संध्याकाळी मुंबईसह ठाणे आणि नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत दादर, फोर्ट, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, सायन आणि माटुंगा परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच दाणादाण उडाली. तर कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 7च्या सुमारास अचानक विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुसरीकडे अर्ध्या तासाच्या पावसामुळे कल्याण पश्चिमेतील केडीएमसी मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या अत्रे नाट्यगृह बाजूच्या रस्त्यावर आणि रामबाग लेन परिसरातील रस्त्यावरती पाणी साचले. या पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढत वाहने चालवावी लागत असून अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे.
मालेगाव, मनमाड, चांदवडसह नाशिकच्या ग्रामीण सुमारास मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पश्चिमपट्ट्यातील मुल्हेर जवळील भटांबे येथे शेती काम करत असतांना एका 38 वर्षीय तरूणावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. विजेच्या कडकडाटासह मेघ गर्जनेने जोरदार पाऊस पडला.
शेतातील काढलेला लाल कांदा, मका, नागली, भात, कांदा, सावा, वरई, कांद्याचे उळे आदी शेतमालाचे नुकसान झाले. तालुक्यातील इतर गावांमध्ये झालेल्या पावसामुळे कांद्याच्या उळ्यासह काढलेला मका, डाळींब, द्राक्षांचे नुकसान झाले. जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजला.