मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यातील कळव्यात जाहीर सभा पार पाडली. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची आज ठाण्यात पहिली सभा पार पडली. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलने ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा जुना व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत सुषमा अंधारे या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत होत्या.
“मला आजचं नेतृत्व तेव्हा टाहो फोडताना दिसलं नव्हतं. आज कोण कुणावर आरोप करतंय सोडून द्या. वडील चोरले वडील चोरले म्हणता ना, ज्या वडिलांवर एवढं प्रेम आहे… मी एकच क्लिप दाखवायला आणली. मी एकदाच लाव रे व्हिडीओ केला होता. तेव्हा सर्वांनी केलं होतं. आता सांगतो लाव रे तो व्हिडीओ… (सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ, परत लाव) यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यात काही देणंघेणं नाही. ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या बाई, ७०-८० वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार दिल्यावर हात लटलटणार असं म्हणणारी ही बाई तिला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता आणि बाळासाहेबांवर प्रेम आहे म्हणून सांगता?”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
“ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यानंतर तुम्ही भुजबळांच्या मांडिला मांडी लावून बसता, तेव्हा माझ्या वडिलांना अटक करायला लावणाऱ्या माणसासोबत बसणार नाही असं वाटलं नाही. कसलं फोडाफोडीचं राजकारण करता. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी त्यांना मिठी मारली. म्हटलं येतो मी. ते म्हणाले, काय करणार आहेस. मी म्हटलं मला माहीत नाही. पण निश्चित मनात होतं, बाळासाहेब सोडून कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. कितीही चढउतार आले तर मार्ग काढीन त्यातून. यांनी काय पाहिलं?”, असं राज ठाकरे म्हणाले.
“मध्यंतरी सुरू होतं, यांना सिंपथी मिळाली. दोन-अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा. भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवली. तुम्हाला लोकांनी युती म्हणून मतदान केलं. निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय सरकार होतनाही लक्षात आल्यावर अडीच अडीच वर्षाची टूम काढली. चार भिंतीत ठरलं. मग आधी का बोलला नाही? मोदींची सभा झाली. हे व्यासपीठावर उपस्थित. मोदी म्हणतात फडणवीस आमचा मुख्यमंत्री असणार, का नाही आक्षेप घेतला? शाहाही तेच म्हणाले. का नाही आक्षेप घेतला? करारबद्दल आधी का नाही सांगितलं? लाखो लोकांची मते वाया घालवली. ज्यांच्या विरोधात लढला त्यांच्यासोबत बसला. आता ते इथे आहेत”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.