सातारा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केला नाही. तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज्यभर प्रचारसभा घेत रान उठवत आहेत. राज ठाकरेंचे उमेदवार उभे नसताना, ते प्रचारसभा का घेत आहेत, याचं उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिले आहे. राज ठाकरे यांनी आज साताऱ्यात प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात देशात फारसं कोणी बोलत नसताना मीच कसा काय बोलतोय? असं मला विचारलं जातं, याचं उत्तर आहे माझे प्रेरणास्थान आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज.” तसेच, “मोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला आवाज महाराष्ट्र होता, मग मोदी आणि शाह ह्यांच्याविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?” असेही राज ठाकरे म्हणाले.
मोदी-शाह जगणं हराम करतील : राज ठाकरे
“राजा रामदेवराय या आमच्या राजाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता. कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की, बेसावध राहू नका. मोदी आणि शाह तुमचं जगणं हराम करू शकतात.” असे आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं.
नोटाबंदीने काय साधलं? : राज ठाकरे
“रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पासून ते मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मोदींनी ह्या देशावर नोटबंदी लादली. असं काय होतं की ह्या सगळ्यांना तुम्हाला विश्वासात घ्यायचं नव्हतं? बरं मोदींनी नोटबंदींनी काय साधलं? नोटबंदीने ४ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काळा पैसा होता तसाच आहे. फक्त भाजपचं सेव्हन स्टार कार्यालय दिल्लीत उभं राहिलं आणि निवडणुका जिंकायला पैसे आले हेच साध्य झालं नोटबंदीने.” असे राज ठाकरे म्हणाले.
सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह बोलणारा परिचारक मोदींच्या व्यासपीठावर कसा? : राज ठाकरे
“भारतीय जनता पक्षाचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबियांबद्दल गैरउद्गार काढतो तरी भाजप कारवाई करत नाही, तो आमदार राहतो. आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही जवानांबद्दलची आस्था.” असे म्हणत राज ठाकरेंनी प्रशांत परिचारक यांच्यावरुन मोदींवर निशाणा साधला.
बेसावध राहू नका : राज ठाकरे
माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे विसरू नका हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे शेवटी राज ठाकरे यांनी साताऱ्यात आवाहन केलं.
VIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण :