मुंबई : मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरु केलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. “केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांना जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो.”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी पत्रक काढून ममता बॅनर्जी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावार छापेमारी केली. सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पाहिले आहे. पण नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करु नये. आपला देश संघराज्य आहे आणि राज्याच्या अधिकारांवर घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही, हे भाजप सरकारने विसरु नये. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांना जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो.” – मनसे अध्यक्ष राज ठाकरे
#SaveDemocracy
…केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी ह्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो. @MamataOfficial pic.twitter.com/tS0EonjYQj— Raj Thackeray (@RajThackeray) February 3, 2019
शारदा चीटफंड घोटाळ्यावरुन केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आमने-सामने आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता त्या पाच अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी सरकार विरोधात धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. त्यामुळे सध्या देशात मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे चित्र आहे आणि आता या वादात इतर नेत्यांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला कुणा-कुणाचा पाठिंबा?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनात उतरले आहेत, तर अरविंद केजरीवाल हे आज ममता बॅनर्जींना भेटायला जाण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांजवळ वॉरंट नव्हता म्हणून त्यांना थांबवण्यात आल्याचे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच, संपूर्ण देश मोदी-शाहांमुळे त्रस्त आहे. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.
काल नेमकं काय झालं?
रविवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी सीबीआयचे अधिकारी रोज व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी तपासाकरीता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचले. मात्र, त्यांना बाहेरच अडवण्यात आले. एसआयटी टीमचे नेतृत्व करत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कागदपत्र आणि फाईल्स गमावल्याबद्दल तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आयुक्तांच्या घरी पोहोचले होते. याबाबत त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र त्याचे काहीही उत्तर आले नाही. त्यानंतर काल (3 फेब्रुवारी) छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
शारदा चिटफंड घोटाळा नेमका काय आहे?
एप्रिल 2013 मध्येच हा घोटाळा उघडकीस आला होता. सुमारे 10 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची शारदा ग्रुपने फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंदाजे 2 हजार 460 कोटींचा शारदा चिटफंड घोटाळा असल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुप या चिटफंड कंपनीने लोकांची फसवणूक केली, त्यासाठी आकर्षित करणाऱ्या ऑफर कंपनीकडून देण्यात आल्या. 15 महिन्यात पैसे दुप्पट मिळतील, यांसारख्या ऑफरचा यात समावेश होता. चार कंपन्यांच्या माध्यमातून अशा ऑफर देण्यात आल्या. मात्र, ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ आली, त्यावेळी या कंपन्यांना टाळे होते.
घोटाळ्याचं टीएमसी कनेक्शन काय आहे?
शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांचं नाव समोर आल्यानंतर, या घोटाळ्याला राजकीय वळण लागलं. कुणाल घोष यांनी या घोटाळ्यात तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगला आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. कुणाल घोष यांनीच या घोटाळ्यात टीएमसीच्या इतर बड्या नेत्यांवर आरोप केले आहेत. तसेच, या घोटाळ्याच्या चौकशीवेळी एसआयटीचे अध्यक्ष राजीव कुमार होते. सध्या ते कोलकात्याचे पोलिस आयुक्त आहेत.
संबंधित बातम्या :
बंगालमध्ये सीबीआय विरूद्ध पोलीस; ममता बॅनर्जीचे धरणे आंदोलन
छापा टाकण्यासाठी गेलेले सीबीआयचे अधिकारी कोलकाता पोलिसांच्या ताब्यात