मुंबई: शिवसेनेने (Shiv Sena) शिंदे गटाला पहिला शह दिला आहे. खासदार भावना गवळी यांना लोकसभेतील मुख्यप्रतोद पदावरून हटवून राजन विचारे (rajan vichare) यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे तसे पत्रं दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत राजन विचारे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. विचारे हे ठाण्यातील खासदार असल्याने ते शिंदे गटाशी हातमिळवणी करतील असं सांगितलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विचारे यांच्याकडे मुख्यप्रतोदपद दिलं असल्याचं सांगण्यात येतं. तर, भावना गवळी या शिवसेनेवर नाराज असल्याने त्या शिंदे गटाकडे जाण्याची चर्चा होती. त्यामुळे तातडीने शिवसेनेने हा बदल केल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेचे 40 आमदार फुटल्यानंतर आता खासदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे खासदार फुटण्याची शक्यता बळावली होती. त्यातच भाजपकडून त्यांच्या संपर्कात 14 खासदार असल्याचं म्हटलं जात होतं. यावेळी राजन विचारे यांच्यावरही संशयाची सुई होती. विचारे हे शिंदे यांच्यासोबत जातील असं सांगितलं जात होतं. विचारे हे ठाण्यातील खासदार असल्याने ते शिंदेंच्या कँम्पमध्ये जाण्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे विचारे हे शिंदे यांच्याकडे जाण्यापूर्वीच शिवसेनेने त्यांना लोकसभेतील मुख्यप्रतोदपदाची जबाबदारी दिली आहे.
भावना गवळी या शिवसेनेवर नाराज आहेत. त्या कधीही शिवसेना सोडू शकतात असं सांगितलं जातंय. भावना गवळी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्या शिंदे गटाता सामिल होतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडील मुख्यप्रतोदपद काढून घेतल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गट नेते होते. त्यांनी बंड केल्यानंतर भरत गोगावले यांना विधानसभेतील मुख्यप्रतोद केलं. सुनील प्रभू यांची मुख्यप्रतोद पदावरून हकालपट्टी केली. तेच लोकसभेत घडू नये याची शिवसेना खबरदारी घेत आहे. उद्या भावना गवळी शिंदे गटाकडे गेल्यास त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांना व्हीप काढून वेगळा निर्णय घेतला तर या भीतीपोटीच त्यांची तातडीने या पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली. यावेळी शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्रं दिलं आहे. भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. इतर खासदारांचीही तिच मागणी असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.