मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना (Rajesh Tope on Balasaheb Thorat) विश्वासात घेऊनच महाविकास आघाडी सरकारचं काम सुरु आहे, असं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (12 जून) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नाराजीबाबत प्रश्व विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं (Rajesh Tope on Balasaheb Thorat).
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतलं जात नसल्याने काँग्रेस नाराज आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काल (11 जून) सांगितलं. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.
“काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विश्वासात घेऊनच काम होत आहे. काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही. आघाडी सरकारची एक छोटी कोअर कमिटी आहे. या कमिटीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन ज्येष्ठ नेते आहेत. या सर्व नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक होते. ही कोअर कमिटी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेते”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
‘हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही’
दरम्यान, या पत्रकार परिषदेत त्यांना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “लोक डॉक्टरला देव मानतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी संवेदनशीलतेने काम करणं जरुरीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना लक्षपूर्वक काम करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय जळगाव आणि मुंबईत मृत शरीर गायब होण्याच्या प्रकरणावरुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत”, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर आरोग्यमंत्री काय म्हणाले?
राज्याचे सामाजक न्याय आणि विकास मंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर, स्वीय साहाय्यक यांना अगोदर कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धनंजय यांना कोरोनाची लागण झाली. याबाबत माझी त्यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा झाली.
धनंजय मुंडे यांची तब्येत एकदम ठिक आहे. त्यांना थोडा श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आम्ही त्यांना ब्रीज कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करत आहोत. सगळी तयारी पूर्ण झाली आहे. त्यांना कोणताही त्रास होणार नाही. ते लवकरच आठ ते दहा दिवसांनंतर आपल्यासोबत पुन्हा कामात सक्रिय होतील, अशी माझी खात्री आहे. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीतही होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमालादेखील हजर होते.
मंत्रिमंडळातील सर्व मंत्री सुरक्षित अंतरावर होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रम फक्त 5 मिनिटाचा होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं फक्त 2 ते 5 मिनिटाचं शुभेच्छाचं भाषण झालं. त्यानंतर तो कार्यक्रम संपला. झेंडा वंदनाचादेखील 5 मिनिटाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 5 ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आम्ही सगळेजण दूर अंतरावर बसलो होतो. सर्वजण शिस्त पाळत होते. कुणालाही लक्षणे जाणवत नसतील तर टेस्टिंग करण्याची गरज नाही.
आम्ही सर्व सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत एक खुर्ची सोडून बैठक व्यवस्था करण्यात आलेली असते. मंत्रीमंडळातदेखील तशाच प्रकारची व्यवस्था केली जाते.
आपल्याला कोरोनाबरोबर जगायचं आहे. त्यामुळे खेळाचे मैदान, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, कॉलेज सर्व ठिकाणी बदल होणार आहेत. जोपर्यंत कोरोनाची लस तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. आपल्याला सतर्कतेने स्वत:ची काळजी घ्यावी लागेल.
जर तुम्हाला लक्षणे दिसत असतील तर तुम्ही तपासणी करावी, अशी आयसीएमआरची गाडलाइन आहे. आसीएमआरच्या गाइडलाइन्सनुसार लक्षणे दिसत असतील तर टेस्टिंग केली जाते.
संबंधित बातम्या :