पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज (27 ऑगस्ट) दुपारी बारामतीत दाखल झाले. त्यांनी दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी त्यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना राज्य सरकारव टीकास्त्र सोडलं. “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं (Raju Shetti protest in Baramati).
राजू शेट्टी बारामतीत दाखल होताच कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत त्यांचं स्वागत केलं. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आपल्यासोबत जनावरांनाही घेऊन आले होते. बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता (Raju Shetti protest in Baramati).
“आम्हाला जास्त जनावरं आणायची होती, पण पोलिसांनी अडवलं. आम्हाला अडवायचा पोलिसांना अधिकार आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करा. गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर, शेण विकलं जातं. पण आमच्या दुधाला किंमत नाही. गाढविनीच दूध 1 हजार रुपये लिटर किंमतीनं मिळतं. पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही?”, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.
“दूध रस्त्यावर ओतलं म्हणून आमच्याकडे देशद्रोही म्हणून बघता. शेतकऱ्याने रागाच्या भरात दूध रस्त्यावर ओतलं तर तुम्हाला राग येतो. पण त्याची आणि पाण्याची किंमत काय? याचा विचार करा”, असं राजू शेट्टी म्हणाले.
“तीन वर्षांच्या तुलनेत यंदा दूध उत्पादन कमी झालं. जनावरांच्या संख्येत फरक पडला. लॉकडाऊनमुळे दूध उत्पादनाला फटका बसला. लॉकडाऊन कुणी जाहीर केलं, त्यांनी विचार केला पाहिजे”, असं मत राजू शेट्टी यांनी मांडलं.
“बाळासाहेब थोरातांच्या डेअरीत काय भाव आहे? याकडे बघा. उत्पादकाला 25 आणि वाहतुकीला 2 रुपये मिळत आहे. हे पैसे कुठे गेले? सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. सहा कोटी लिटर दुधाची खरेदी केली. त्यात दीडशे कोटी रुपये लुटले. मात्र भाववाढ झाली नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आधी सांगितलं मिळेल मात्र अजून मिळालेले नाही”, असं राजू शेट्टी म्हणाले.
फलटणचं गोविंद दूध-रामराजे यांचं नेतृत्व ( राष्ट्रवादी ) 7 लाख 20 हजार लिटर
राष्ट्रवादीचे फत्तेसिंग नाईक शिराळेचे आमदार यांनी 25 रुपये भाव दिले
येवला दूध संघ ( किशोर दराडे ) शिवसेनेचे नेते – 17 ते 18 रुपयांच्या वर भाव दिले नाही
मोहिते पाटील – शिवामृत, अकलूज
माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी ) 18 रुपयांच्यावर भाव नाही दिला
अजित दादा यांचं नेतृत्व – सर्वाधिक खरेदी, बारामती तालुका
बीड तानाजी कदम ( राष्ट्रवादी ) योग्य दर नाही
अकोले मधुकर पिचड ( भाजप ) योग्य दर नाही
सुरेश धस ( भाजप ) योग्य दर नाही
हरिभाऊ बागडे ( भाजप ) 20 रुपयांच्या वर नाही
विखे पाटील ( भाजप ) पैसे योग्य दर नाही
जयंत पाटील ( राष्ट्रवादी ) योग्य दर नाही
अमित देशमुख ( काँग्रेस ) 20 रुपयांच्या वर नाही
सांगली कोल्हापूरमध्ये 25 रुपयांनी दिलं
रणजित देशमुख ( थोरतांचे नातेवाईक ) १९ रुपयांनी दूध घेतलं
बबन पाचपुते ( 20 रुपयांच्या वर भाव नाही )
नेवासा शंकरराव गडाख ( शिवसेनेचे नेते ) योग्य दर नाही – असं राजू शेट्टी म्हणाले.
“या लोकांनी दीडशे कोटींवर दरोडा टाकला, आता परत दोन महिने दरोडा टाकायची परवानगी दिली. तुम्ही आम्ही मावस भाऊ आणि सगळे मिळून वाटून खाऊ. अशी राज्यात परिस्थिती आहे. काही दूध संघ फक्त कागदावरचे, आणि सरकारला 17 ते 18 रुपयांनी विकले आहे, त्यात मंत्र्यांचा सहभाग”, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
“उद्धव साहेब दूध उत्पादकांनी लोढणं का घेऊ नये? खाजगी दूध संघांना कुणी विचारत नाही. त्यांच्यावर नियंत्रण नाही. केंद्र सरकार दूध पावडरचा निर्णय घ्यायला तयार नाही. राज्य सरकारदेखील खमकी भूमिका घेत नाही. साखरच्या बाबतीत निर्यातीवर नियम मोडून निर्णय, मग दुधाबाबत का निर्णय होत नाही? “, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : GST थकबाकी वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर, जीएसटी परिषदेत अजित पवारांकडून भीती व्यक्त