सोलापूर : महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळतंय. स्वाभिमानीची ‘हुंकार बळीराजा’ यात्रा सोमवारी सोलापुरात आली. त्यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर पीएम किसान योजनेबाबत (PM Kisan Scheme) बोलताना मोदीसाहेब माझी विशेष काळजी घेतात, असं मिश्किल वक्तव्यही शेट्टी यांनी केलीय त्यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्याचवेळी पीएम किसान योजनाच बोगस आहे. या योजनेसाठीचे पात्र-अपात्रतेचे निकष काय आहेत? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केलाय.
पीएम किसान योजनेबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, पीएम किसान योजनाच मुळात बोगस आहे. मी या योजनेसाठी अपात्र आहे. म्हणून 12 हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांकडे जमा केला. तरीही मला नियमितपणे पैसे येतात. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना तुम्ही शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे… असा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हजरजबाबीपणे शेट्टींनी तो प्रश्न मध्येच तोडत ‘हं.. मोदीसाहेब माझी विशेष काळजी घेत आहेत’, अशी मिश्किल टिप्पणी केली. शेट्टींच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
महाविकास आघाडी सरकार धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नसून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. तसेच आपल्याला विचारात घेतले नाही, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली खदखद मांडली. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून आपण बाहेर पडत असल्याचे कोल्हापूरात जाहीर केले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील लक्ष केले आहे. यावेळी शेट्टी यांनी पवार यांच्या, ‘ऊस हे तसे आळशी माणसांचे पीक आहे’, या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच त्यांना शेट्टींनी शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही ओळखलेच नाही असे म्हटले आहे.
ऊस शेती आळशी असेल तर तुमच्या नातवांचे 12 साखर कारखाने कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर ऊस शेती करताना शेतकऱ्याला किती काबाड कष्ट करावे लागते हे सांगत पवारांना उत्तर दिले आहे. तसंच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पवारांनी चुकीचे ओळखले. पवार हे विसरत आहेत की, या आळशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर महाराष्ट्राची कारखानदारी उभी राहिली आहे. कारखानदारीतून होणाऱ्या भ्रष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावलाय.
इतर बातम्या :