मुंबई, दि. 14 फेब्रुवारी 2024 | राज्यसभा निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवार जाहीर झाला आहे. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे हा उमेदवार महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीतून केवळ एकच जागा निवडून येऊ शकते. यामुळे काँग्रेसला ही उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. दिल्लीवरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले.
जून २०२२ मध्ये राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. त्यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश होता. या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपने प्रसाद लाड या पाचव्या उमेदवार निवडून आणले होते. त्याचवेळी काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. परंतु चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते.
चंद्रकांत हंडोरे त्यांनी विलासराव देशमुख मंत्रीमंडळात होते. १९९२ ते १९९३ या कालावधीसाठी त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती. हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना “भीम शक्ती”चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. विधान परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे दलित समाजात नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी आता काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. परंतु यंदाही भाजप सहावी जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे हंडोरे यांच्यासमोर आव्हान कायम असणार आहे.
विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचा ठपका चौकशी समितीनेही भाई जगताप यांच्यावर ठेवला होता. दिलेल्या कोट्यापेक्षा पक्षाची अधिकची मते मिळवून भाई जगताप स्वत: विजयी झाले. पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे हंडोरे यांचा पराभव झाल्यामुळे भाई जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदही सोडावे लागले होते. काँग्रेसने जाहीर केलेल्या चार उमेदवारांमध्ये चंद्रकांत हंडोरे यांच्यासह राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग, हिमाचल प्रदेशातून अभिषक मनू संघवी यांना उमेदवारी दिली.