मुंबई : राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. मात्र, मतदानावेळीही मोठं राजकारण पाहायला मिळत आहे. आधी भाजपकडून काँग्रेसच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर (Amar Rajurkar) यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केलाय.तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप घेतला होता.
बावनकुळे म्हणाले की, कुठल्याही मतपत्रिकेला मी हात लावला नाही. मला जो अधिकार दिला होता कुणाला मत करण्याचा आणि तो पाहण्याचा त्या अधिकाराचा मी फक्त वापर केला. कुठल्याही मतपत्रिकेला हात लावला नाही. उलट त्यांनी जे काही मतपत्रिका हातात घेतल्या होत्या त्याला आम्ही आक्षेप घेतला. त्याला काऊंटर करण्यासाठी ते हा आरोप करत आहेत. या आक्षेपात काही तथ्य नाही, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं.
‘माझ्या मतदानावर आक्षेप घेऊन साध्य काय होणार. टीव्हीवर दोन तास चर्चा होणार, त्यासाठी इतरी धडपड सुरू आहे. महाविकास आघाडीत काय सुरू आहे, हे आमचे आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला काय करायचे आहे? स्वत:च्या खाली काय जळते आहे ते पाहायचे सोडून दुसऱ्याचे वाकून पाहिले की खाली जास्त आग लागते, असा घणाघात त्यांनी केला. सगळी बुद्धी अळवणी यांनाच दिली आहे का?’, असा सवाल करत त्यांनी भाजपा नेते पराग अळवणी यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच त्यांनी आक्षेप घेतला तर घेतला. काय फरक पडतो. मात्र यावरून ते किती घाबरलेत, हेच दिसते, असा टोलाही आव्हाडांनी लगावला आहे.